Subscribe

RSS Feed (xml)

Powered By

Skin Design:
Free Blogger Skins

Powered by Blogger

Wednesday, May 21, 2008

सती - 2

१६ मे २००२.

१३ मेला नागपूर गाठलं आम्ही. तब्बल चार तास लेट झालेली फ़्लाईट. नागपूरला उन्हाळा मी म्हणत होता. तिथे शिशिरच्या आत्यांकडे उतरलो. विश्रांती, जेवण, थोड्याफार गप्पा... सकाळी तरी लौकरच जाग आली. कुठल्यातरी ट्रॅव्हल्सची बस, सीट्स अडचणीच्या! माझ्या कपाळावरची आठी पाहून शिशिर म्हणाला, ' अगं, थोड्याशा अंतराचा तर प्रवास आहे. चालवून घे आता. ' हा लगोलग टुणकीला जायचा हट्ट खरंतर माझाच, त्यामुळे उगीच तक्रार करण्यात काही अर्थ नव्हता.

खिडकीतून मुकाट बाहेर बघत राहिले. सगळीकडे जाणवणारा रखरखाट. कधी एकदा शेगाव येतं असं झालेलं. तिथून पुढेही प्रवास होताच!
' आपण कुणाकडे राहणार आहोत टुणकीला? ' हा प्रश्न विचारायचं मला आत्ता सुचत होतं.
' आत्याने दिलाय एकांचा पत्ता. इनामदारांच्याच नात्यात आहेत म्हणे! त्यांच्याकडे जाऊया. आत्याची ओळख आहे; नाही म्हणायचे नाहीत. '

शेगावला पोचलो. बस स्टॅंडवर चौकशी सुरु केली; टुणकीला जाणार्‍या बसची. बराच वेळ काही माहितीच मिळेना. उन्हाने जीव कासावीस व्हायला लागला. शिशिर इतर काही व्यवस्था होतेय का बघायला स्टॅंडबाहेर गेलेला; तो येण्याची वाट बघत तिथेच एका बाकावर टेकले.

आजूबाजूला टिपिकल वातावरण... येऊन लागणार्‍या, लागलेल्या, निघणार्‍या बसेस, बस लागल्यावरची लोकांची झुंबड, तर्‍हेतर्‍हेचे आवाज, उन्हाने त्रस्त होऊन किंचाळून रडणारी लहान बाळं... त्यांना त्रासलेल्या त्यांच्या आया... दूरवर खाद्यपदार्थांचा स्टॉल दिसत होता, पण मला काही खावंसंच वाटत नव्हतं. मनात मधून मधून रमेच्या कथेचाच विचार.. का गेली असेल सती ती? भाग पाडलं असेल का तिला कुणी? ही कथा मी आधी कधीच ऐकलेली नव्हती आईंकडून. नेमकी ती त्यांना आत्ता का आठवावी? आणि तिचा तो आशीर्वाद, तिचा कोप वगैरे गोष्टी खर्‍या असतील का? किती वेळ मी तशीच विचार करत बसून राहिले; कुणास ठाऊक!

शिशिरने मला हलवलं तेव्हाच तंद्री मोडली माझी.
' काय रे? '
' बसचं माहीत नाही, पण एक गाडी जातेय टुणकीला. त्या ड्रायव्हरला पटवलंय मी. टुणकीत आपण ज्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांना ओळखतो म्हटला तो. चल आता. ' मला जरा भीतीच वाटली.

अनोळखी मुलूख, आणि हा कुणावरही विश्वास ठेवून कसा काय तयार होतो. रस्त्यात काही केलं म्हणजे? माझ्या चेहर्‍यावरचे भाव शिशिरला वाचता आले असावेत.
' चल गं, काही होत नाही. इथे बसून वैतागण्यापेक्षा निघालेलं बरं... किती वेळ लागेल बस मिळायला देव जाणे... ' तो त्रासलेला दिसत होता.

मी बॅगा उचलून निमूटपणे त्याच्यासोबत चालू लागले. शिशिरमध्ये कधीकधी मला माझ्या बाबांच्या स्वभावाचाच भास होतो. बेधडक निर्णय घेण्याची वृत्ती.. भीती, काळजी हे शब्दच शब्दकोशात नसावेत बहुधा. बाहेर एका झाडाखाली एक जुनाट जीप उभी होती. दोन्ही बाजूंना दारं नसलेली, जुन्या स्टाईलची जीप!

' सामान मागे टाकू का? ' शिशिरने त्याला विचारलं. त्याने काही न बोलता होकारार्थी मान हलवली. सामान टाकून आम्ही आत चढून बसलो. शिशिर ड्रायव्हरशेजारी बसला अर्थातच! धुरळा उडवत जीप धावू लागली. मागे वळून शिशिरने विचारलं, 'Comfortable?' मी हो / नाही च्या मध्ये मान हलवली.

' शिशिर, आपलं बोलणंच झालं नाही ह्याबद्दल फारसं... तुला काय वाटतंय ह्या सतीच्या कथेबद्दल? '
' काहीच नाही. ' तो सहजपणे म्हणाला. ' आई गेल्यावर तू बरीच अस्वस्थ होतीस, आईने तुला सांगितलेली तिची शेवटची इच्छा तू पूर्ण करायची तयारी दाखवलीस, आणि अनायासे जमतही होतं, म्हणून मी ह्या ट्रिपला हो म्हटलं इतकंच! बाकी ह्या सतीच्या कथेबद्दल म्हणशील तर मला आधी कधी आईने ती सांगितल्याचं आठवत नाही. बहुधा बाबांनी आईला हे असलं काही मला सांगायला मना केलं असावं. त्यांचा तर असल्या गोष्टींवर अजिबातच विश्वास नव्हता. किंबहुना अशा गोष्टींची त्यांना काहीशी चीडच! '

' पण आईही नव्हत्या ना अंधश्रद्ध! '
' खरंय.. नव्हती खरंतर! मग या एकाच बाबतीत असं का व्हावं, माहीत नाही... ' मी बाहेर बघत राहिले.

एक कुठलंतरी छोटं गाव लागलं. उन्हानं सगळेच व्यवहार जवळपास थंडावलेले. तुरळक लोक दिसत होते. जीपमध्ये आम्ही तिघे गप्पच बसलेलो! ड्रायव्हरलोक बर्‍यापैकी बोलके असतात, हा आमचा नेहमीचा अनुभव. गेल्या वर्षी नैनिताल ते कौसानी प्रवासात आमच्या ड्रायव्हरने त्याच्या गावातल्या एका शापित हवेलीची कथा आम्हाला अगदी रंगवून रंगवून सांगितलेली.... हा मात्र अगदी शांतपणे गाडी चालवत होता.

' अजून किती वेळ लागेल म्हणे? ' त्या शांततेचा भंगच करायचा या इराद्याने मी प्रश्न विचारला.
' अजून तरी दीड तास... ' एवढंच त्रोटक उत्तर देऊन तो पुन्हा गप्प झाला.

सीटच्या पाठीवर डोकं टेकून मी डोळे मिटून घेतले. पेंग यायला लागली होतीच! किती वेळ असा गेला कोण जाणे! आणि मला ते स्वप्न पडलं.
हिरवी साडी नेसलेली एक बाई, अतिशय देखणी, जेमतेम तिशी पस्तिशीतली असावी, केसांचा अंबाडा, सगळे सौभाग्यालंकार घातलेले. चेहरा मात्र निर्विकार, भावहीन. माझ्याकडे रोखून पाहतेय असं वाटायला लागलं. मी दचकूनच जागी झाले. घामाने चिंब झाले होते.

' सुधा?आर यू ओके? ' शिशिरचं लक्ष गेलंच माझ्याकडे. अजून एका लहान गावात गाडी थांबलेली.

' काही नाही... काही नाही. मी बरी आहे. तहान लागलीय. कुठे जरा एखादी बिसलेरीची बाटली, एखादं कोल्ड ड्रिंक मिळालं तर बघतोस का? ' मी त्याला स्वप्नाबद्दल काहीच बोलले नाही.
' बाय द वे, हे गाव कुठलं? ' मी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं, ' आणि तो ड्रायव्हर कुठेय? '
' वरवट बकाल का काहीतरी आहे. त्याला शेतीचं काही सामान घ्यायचंय ते आणायला तो गेलाय. ' शिशिर उतरून पाणी आणायला गेला आणि त्या स्वप्नाचा विचार करत मी गाडीत तशीच बसून राहिले.

क्रमशः

1 comments:

Meghana Bhuskute said...

मस्तच. उत्सुकता ताणून धरली आहेस अगदी. कुठेही काही कृत्रिम पाणी घातल्यासारखे न वाटता. लवकर लिही... :)