Wednesday, May 21, 2008

१७ मे २००२.



प्रवास पुढे चालू झाला. ड्रायव्हर त्याचं मौनव्रत सोडून शिशिरशी काहीबाही गप्पा मारत होता. माझ्या डोक्यातून मघाशी पडलेल्या स्वप्नाचा विचार काही जात नव्हता, म्हणून त्यांच्या बोलण्यात भाग घ्यावा असंही वाटेना. तशात उन्हाने डोकंही दुखायला लागलं होतं. मी टुणकी येण्याची वाट बघत बसून राहिले. एका टपरीवजा हॉटेलापाशी जीप थांबली. तिथंच चार रस्ते फुटत होते.



' आलं टुणकी! ' ड्रायव्हरने जाहीर केलं तशी मी चकितच झाले. डावीकडं चारसहा तुरळक घरं दिसत होती. बाकी तिन्ही बाजूंना फक्त शेतंच! गाव असेल असं वाटतही नव्हतं. आम्हाला ज्यांच्याकडे जायचं होतं, त्यांचा घर डावीकडच्या रस्त्यावरून जरा पुढं गेल्यावर उजवीकडच्या एका गल्लीत होतं म्हणे! ते शोधायला काही कठीण नाही असं त्या ड्रायव्हरचं मत पडलं शिवाय तिथवर जीप गेली नसती, म्हणून आम्ही तिथेच उतरलो आणि इनामदारांचं घर शोधायला सुरुवात केली.



गावात सगळीकडे शांतताच! दुपारचे चार वाजले होते. ऊन तापत होतंच... डावीकडे पहिल्यांदा गावातली ( बहुधा एकमेव!) शाळा दिसली. एकमजली कौलारू घरासारखी शाळा. तिथेही सामसूमच दिसत होती, पोरांना सुट्ट्या लागल्या असणार. रस्त्यावर भेटलेल्या चारदोन लोकांकडे चौकशी करत करत, इनामदारांचं घर सापडलं एकदाचं!



आसपास छोटी छोटी घरं होती. चार दोन मुली अंगणात काहीतरी वाळवण राखायचं काम करत होत्या. एक बाई एवढ्या दुपारी खराट्यानं तिच्या घरासमोरचं अंगण झाडत होती. आम्ही तिथून जाताना त्यांनी आमच्याकडे अगदी निरखून बघितलं. माझा जीन्स टॉप हा पेहराव त्या ठिकाणी भलताच विसंगत वाटत होता बहुधा!



इनामदारांच्या घराचा बाहेरचा दरवाजा बंदच होता. चारदोन वेळा कडी वाजवल्यावर एका बाईने येऊन दार उघडलं. ' कोण आहे, शांताबाई? ' आतून एका बाईंचा आवाज ऐकू आला. शांताबाईंनी आम्हाला आत यायला सांगितलं. आतमध्ये प्रशस्त अंगण होतं. डाव्या बाजूला गुरांचा गोठा होता. तिथेच भिंतीला टेकून उभ्या केलेल्या दोन तीन जुन्या मॉडेलच्या सायकली. बाकीही बरंच सामान अंगणात पडलं होतं. माझ्यासाठी हे सारं वातावरण अनोखं होतं.



' तूच शिशिर इनामदार का रे? ' साधारणपणे पन्नाशीच्या बाई असतील त्या! नऊवारी साडी नेसलेल्या. ' हो... आत्याने फोन करून सांगितलंच असेल. '

' आज सकाळीच फोन आला होता तिचा. कालही करत होती म्हणाली. आमच्या फोनचा त्रासच फार. लागला तर लागतो कधीतरी.. माझा नातू खेळणं म्हणूनच जास्त वापरतो. ' त्या हसत म्हणाल्या. ' सॉरी, असं अचानक येऊन बराच त्रास देतो आहे तुम्हाला... '

' त्रास कसला रे त्यात? तुम्ही आलात, छान वाटलं. ' त्या मनापासून म्हणाल्या. ' तुझी आज्जी यायची दर्शनाला तेव्हा आमच्याकडेच हक्काने उतरायची. तुझ्या आईचं काही येणं नाही झालं मात्र... ' बर्‍याच वर्षांची ओळख असावी तसं त्या मनापासून बोलत होत्या. मला छान वाटत होतं. त्यांनी आमची आवर्जून सगळ्यांशी ओळख करून दिली. त्यांच्या सासूबाई, पार नव्वदीला टेकलेल्या, चांगल्याच गप्पिष्ट. त्यांची सून आशा, यजमान लक्ष्मणराव, मुलगा श्रीधर, गोड आणि मस्तीखोर नातू विकास... थोड्याच वेळात त्यांच्या घरात संकोच वाटेनासा झाला. रात्री जेवणं आटोपली. मी आज्जींच्या खोलीत बसून त्यांच्याशी गप्पा मारत होते. ' चांगलं आहे हो... सासूची इच्छा पूर्ण करतेयस.. आजकालच्या मुली कुठे अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात म्हणा... ' विश्वास माझाही नव्हता तसा, मी आईंची इच्छा म्हणून आले होते. पण हे त्यांच्यापाशी का बोला असा विचार केला मी! त्यांना सांगावं का स्वप्नाबद्दल, अचानक विचार आला मनात... ' आज्जी, आज आम्ही येत असताना मला पेंग आली जरा... तेव्हा मला स्वप्न पडलं. एक सवाष्ण बाई आली होती स्वप्नात.. हिरवी साडी नेसलेली.. ' ' रमाच ती... इनामदारांच्या काही सुनांना स्वप्नात दर्शन दिलंय म्हणे तिनं! त्यांनी आपल्या कर्तव्यात चुकू नये म्हणून.... ज्यांनी यात कसूर केलीय त्यांना त्याचा त्रास झाल्याशिवाय राहिलेला नाही. ' मला एकदम आईंनी सांगितलेलं आठवलं. जन्माला येऊन अवघ्या तासाभरात गेलेली त्यांची मुलगी... ' पण असं का? तिचं दर्शन घेतलं काय, न घेतलं काय, तिचा आशीर्वादच लाभावा नं घराण्याला... हा त्रास कशासाठी? ' माझा स्वर नकळत चिडका झालेला. ' तिची कहाणी ऐकलीस तर कदाचित कळेल बयो तुला... ' त्या सांगू लागल्या, रमेची कहाणी. अगदी मध्यरात्र उलटून जाईस्तोवर. क्रमशः

0 comments: