Subscribe

RSS Feed (xml)

Powered By

Skin Design:
Free Blogger Skins

Powered by Blogger

Thursday, May 22, 2008

सती - ४

१८ मे २००२.

' ....लहान होते, तेव्हा माझी आई सांगायची हो राघोजी इनामदारांच्या कथा... कसं त्यांनी एके वेळी एका वाघाला तलवारीच्या एका फटक्यात गारद केलं नि कसे ते पन्नास दरोडेखोरांशी केवळ दोन साथीदारांच्या सहाय्याने झुंजले. राघोजी इनामदार खरोखर मोठा कर्तृत्त्ववान माणूस. त्यांच्या वडिलांनी मिळवलेली इनामदारी त्यांनी अथक प्रयत्न करून राखली; वाढवली. त्याकाळी या भागातही दरोडेखोर लुटारूंचा उपद्रव फार! पण राघोजी इनामदारांना भीती म्हणून ठाऊक नव्हती. हातात तलवार घेऊन रात्रीबेरात्री हिंडत असत.

त्यांची पहिली पत्नी, पार्वती... इनामदारांइतकंच तोलामोलाचं घराणं होतं तिचंही! दिसायला पार्वती देखणी, शिवाय राजेशाही थाटात वाढलेली, काहीशी अहंकारी... शोभायचंही तिला ते म्हणा! वयाच्या दहाव्या वर्षी पार्वती वीस वर्षांच्या राघोजींची पत्नी म्हणून इनामदारांच्या वाड्यात आली. राघोजी आणि पार्वतीची जोडी दृष्ट लागावी, इतकी सुंदर... राघोजी एकुलते एक त्यामुळे एकुलत्या एका देखण्या, सुस्वभावी सुनेच्या कौतुकात कुठं कमतरता नव्हती.

वर्षं उलटली, तसं इनामदारांना जाणवू लागलं, कुठेतरी, काहीतरी न्यून आहे सुखात! पार्वतीची कूस काही उजवत नव्हती. नवस, सायास, वैद्यांची औषधं सगळं सगळं दोघांनीही करून पाह्यलं. परिणाम शून्य! जसे जसे दिवस जाऊ लागले तशी तशी मुलाची आशा मावळायला लागली. मग नर्मदाबाई इनामदारांनी निर्णय घेतला.... राघोजी इनामदारांचं दुसरं लग्न लावून द्यायचा! राघोजी एकुलते एक.. इनामदारांचा वंश पुढे वाढवण्यासाठी हे त्यांना करायलाच हवं होतं.. '

असलं काही ऐकलं की माझ्या डोक्यात तिडीकच जाते. मी काहीतरी बोलायला म्हणून त्यांच्याकडे बघितलं, तशी म्हणाल्या,

' ठाऊक आहे पोरी, तुला हे विचार पटत नसतील, संतापली असशील या गोष्टीने.. पण तो काळ तसाच होता बायो... तो काळ तसाच होता. नर्मदाबाई इनामदारांनी पस्तिशीच्या राघोजी इनामदारांसाठी देशमुखांच्या सोळा वर्षांच्या रमेला मागणी घातली. देशमुखही वतनदार पण त्याआधीच्या काही वर्षांत आलेल्या संकटांमुळं आणि भाऊबंदकीमुळं त्यांची परिस्थिती ' बडा घर, पोकळ वासा ' अशी झालेली... रमेच्या लग्नाची त्यांना चिंता होतीच. इनामदारांसारख्यांनी मागणी घातलीय म्हटल्यावर त्यांना स्वर्ग दोन बोटं उरला. आपल्यापेक्षा एकोणीस वर्षांनी मोठ्या राघोजींशी लग्न करून रमा पार्वतीची सवत म्हणून वाड्यात आली. पार्वतीचं बिनसलं ते इथंच! तिचं राघोजींवर नितांत प्रेम होतं, त्यात कुणी वाटेकरीण यावी... तिच्याच्याने नाही सहन झालं ते. पार्वती अंतर्बाह्य बददली.. कठोर, कोरडी झाली.. संतापानं अखंड धुमसू लागली.
रमेचा दोष यात काहीही नव्हता... ती अजाण, अल्लड होती. इनामदारांची कीर्ती परिचयाची होतीच तिच्या! इनामदारांकडं येताच दबून गेली. राघोजींचा मात्र रमेवर जास्त जीव जडला. दिसायला ती पार्वतीहूनही सुंदर... पार्वतीनं तिचा दुस्वास करायला सुरुवात केली.

वर्षभरात रमेला मुलगा झाला. नर्मदाबाई, थोरले इनामदार, यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. रमेचं घरातलं स्थान उंचावलं. पार्वतीचं महत्त्व अर्थातच कमी झालं. रमा जराशी निर्धास्त झाली होती. तिच्या आयुष्यात जरा जरा सुख येऊ लागलं होतं. नर्मदाबाईंची मोठ्या सुनेवर आता कडक नजर होती. पार्वतीला आपलं नशीब स्पष्ट दिसायला लागलं होतं. तशात ते आक्रीत घडलं...
राघोजी इनामदारांना क्षयरोग जडला. प्रकृती झपाट्याने खालावत चालली. आपल्या लेकाची ही दुर्दशा पाहून थोरल्या इनामदारांनी हाय खाल्ली आणि वर्षभरात ते निवर्तले. नर्मदाबाईंनीदेखील कच खाल्ली होती. पार्वतीला जणू नवी वाट गवसली. अख्ख्या इनामदारीच्या जबाबदार्‍या स्वतःच्या खांद्यांवर पेलून समर्थपणे उभी राहिली पार्वती... राघोजींना वाड्याबाहेर देखील पडता येईना झालं. पार्वतीनं सगळी सूत्रं स्वतःकडे घेतली. तिचं एकछत्री साम्राज्य प्रस्थापित झालं, घरावर. इतकंच काय, नर्मदाबाईदेखील तिच्यापुढे दबून राहू लागल्या. रमेचा जाच वाढला. राघोजी सगळं बघत होते, पण असहाय्य होते. त्यांनी रमेला सदैव स्वतःपाशीच रहायला सांगितलं. पण पार्वतीला काहीही फरक पडत नव्हता. राघोजींबद्दलचं प्रेमही आटलं होतं बहुधा! रमेला थोडा आधार होता तो राघोजींचाच! पार्वती राघोजींची थोडीफार काळजी घेत असे, ते केवळ तिला कुणी बोल लावू नये म्हणून! रमेचे मात्र हाल सुरु होते. राघोजींच्या दुबळ्या आधाराने ती कशीबशी दिवस कंठत होती. लग्नानंतरचे सुरुवातीचे सुखी दिवस केव्हाच संपुष्टात आले होते. राघोजींच्या मनावर आणि पर्यायाने घरावर राज्य करणार्‍या रमेला आश्रिताची अवस्था प्राप्त झाली...

क्षयाबरोबर चाललेली लढाई राघोजी तब्बल बारा वर्षांनी हरले. ते गेले, तेव्हा फक्त रमा होती त्यांच्याजवळ... ते गेले तेव्हाच रमेला जाणीव झाली, पुढे काय वाढून ठेवलं आहे याची! पार्वतीची सत्ता, राघोजींचं आता नसणं, आयुष्यभराचा जाच, घरात काडीवरही हक्क नसणं.. आता पार्वतीला अडवणारं कुणीच नव्हतं... कदाचित सूडापायी ती आपल्याला...????? आणि तिने तो निर्णय घेतला....
सती जाण्याचा! '

' पार्वतीला अर्थातच त्याचं काही वाटलं नाही. रमेला तिच्यालेखी काहीही महत्त्व नव्हतंच नाहीतरी. रमा मात्र दुःखाने धुमसत होती... इतक्या वर्षांची मानहानी, उपेक्षा, आश्रितासारखं जिणं, ज्या नवर्‍याच्या आधाराने ती या घरात आली होती, त्याची असहाय्यता, तिच्यासाठी कुणीच काहीच न करणं... राघोजींच्या पार्थिवाला अग्नी द्यायची वेळ आली.

रमेने हिरवी साडी नेसली, नर्मदाबाईंनी तिच्या अंगावर सौभाग्यलेणी चढवली. राघोजींचा देह चितेवर ठेवला गेला. गावातल्या सवाष्णींनी रमेची ओटी भरली. आणि त्या सतीपुढे आशीर्वादासाठी वाकल्या. रमेची नजर पार्वतीकडे गेली. तिचा चेहरा निर्विकार होता. ' सती, आशीर्वाद दे बायो.... ' नर्मदाबाईंनी तिला म्हटलं तशी ती भानावर आली...

' माझ्या आशीर्वादानं इनामदारांच्या घराण्यात कुणालाही अपत्यसुखाच्या बाबतीत कसलाच त्रास होणार नाही. ' पार्वती चमकली. रमेनं जाता जाता तिच्या वर्मावर घाव घातला होता. तिच्या अपत्यहीनतेवर तिने सरळ बोट ठेवलं होतं. त्या घटनेनंतर काही दिवसांनी तिथे देऊळ आणि तुळशीवृंदावन बांधण्याचं काम सुरु झालं. पंचक्रोशीतल्या बायाबापड्या तिथे दर्शनाला यायला लागल्या. कर्मधर्मसंयोगाने त्यातल्या काहींना मुलंही झाली. सतीचा आशीर्वाद फक्त इनामदार घराण्यावरच नाही तर तिचं मनोभावे दर्शन घेणार्‍या सगळ्यांवर आहे ही जाणीव पक्की होऊ लागली. पुन्हा एकदा रमेला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं. यावेळेस पार्वतीला करता येण्याजोगं काहीही उरलं नव्हतं.

रमेचा मुलगा, बाळाजी... आई सती गेली तेव्हा तो जाणता झाला होता. आईची होणारी उपेक्षा त्याने बघितली होतीच. सुरुवातीला काही दिवस, इनामदारांचा मुलगा, वंशाचा दिवा, म्हणून पार्वतीने त्याला माया लावू पाहिली. पण बाळाजीने तिला कधीही आदर दिला नाही. थोडा मोठा होताच त्याने इनामदारीची सारी सूत्रं स्वतःकडे घेतली. सगळी कुळं, नोकरचाकर ' धाकल्या मालकांचाच ' हुकूम ऐकणार हे स्पष्ट दिसत होतं. पार्वतीची सत्ता संपली. जगण्यात तिला काही रस उरला नव्हता. असाच तिने एके रात्री विष पिऊन जीव दिला. चार दिवस लोक त्याबद्दल बोलले तेवढंच! नंतर मात्र पार्वतीची आठवणही कुणाला राहिली नाही.... '
त्या बोलायच्या थांबल्या होत्या. माझ्या मनात दोघींविषयी कणव दाटून आलेली... नियतीने त्या दोघींना का असं खेळवावं? आता मला जाऊन रमेची पूजा वगैरे करावीशी वाटेना. सर्वसाधारण बाई होती ती... जाचाने त्रासलेली, सतत दुःख सहन केलेली, नवर्‍यामागोमाग कदाचित इच्छा नसताना मृत्यू पत्करलेली... शेवटच्या क्षणीदेखील सवतीवर सूड उगवण्याची संधी न सोडणारी... आयुष्यभर जे महत्त्व तिला मिळालं नाही ते जिवाचं मोल देऊन मिळवणारी... तिच्या कृतीत दिव्य, उदात्त असं काहीही नव्हतं. अगदी राघोजींबद्दलचं प्रेमही नव्हतं. होती ती पार्वतीबद्दलची भीतीच!

' झोप बायो... उद्या तुम्हाला जायचंय ना रमेच्या दर्शनाला? ' आज्जींच्या आवाजाने मी भानावर आले. रात्र बरीच झाली होती. पण दुसर्‍या दिवशी जावं की न जावं? या द्वंद्वात गुंतून मी रात्रभर जागी होते.

क्रमशः

1 comments:

Meghana Bhuskute said...

अफलातून. असल्या गोष्टींतून सहसा गूढापलीकडे कशाला महत्त्व दिलेलं नसतं. पण पार्वतीच्या भावना किती सहज उभ्या केल्या आहेस तू. मोजक्या शब्दांत. म्हटलं तर गोष्ट रमेची. पण तिच्याआड धुमसणारी अगतिक पार्वती आहे. नर्मदाबाईही... आणि पुढे सुधा. लवकर लवकर लिही. वाट पाहायला लावू नको..