२ जून २००२.
आता जरा रूटीन मूळपदावर येतंय. टुणकीहून परतल्यावर त्या सगळ्या प्रवासाने प्रचंड थकायला झालेलं. तशात डोळ्यांसमोर तो एकाट वाडा दिसायचा. त्याच्या आसपासची ती नीरव शांतता, लांबूनच बघितलेलं ते रमेचं देऊळ.... आणि रमा आणि पार्वतीची कथा...
मी तिथे जाऊनही दर्शन घेतलं नाही रमेचं. आईंना वचन दिलं होतं खरंतर! मी केलं ते चूक की बरोबर? बाबांना फोन लावला.
' केलंस ते योग्यच केलंस, सुधा. माझा आधीपासूनच या गोष्टीला विरोध होता. आणि काहीही होणार नाही. काळजी करू नकोस. ' ते त्यांच्या नेहमीच्या शांत, आश्वासक सुरात म्हणाले. माझं मन बरंच शांतावलं. उद्यापासून ऑफिस सुरू पुन्हा. एकदा तिकडे गुंतले की हे विचार जरा बाजूला पडतील.
शिशिरला विचारलं कालच, ' आईंची इच्छा मी अखेर पुरी केलीच नाही शिशिर. तुला राग आला नाही ना माझा? '
' नोप्, राग वगैरे नाही आला. दर्शन घ्यायचा निर्णयही तुझाच होता आणि न घ्यायचाही... मला का राग येईल, सुधा? ' शिशिरसारखा समजूतदार माणूस शोधून सापडणं कठीण.
आज जाऊन बरीच खरेदी करून आले. वाणसामान भरलं. घर जरा नीट आवरलं. उद्यापासून एकदा ऑफिस सुरू झालं की कशालाच वेळ उरणार नाही.
आज शेजारची सौम्या आली होती संध्याकाळी. पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी गेली होती चांगले चार महिने. तिला आईंचं कळलं आल्या आल्या. लगेच भेटायला आली होती. मुलीलाही बरोबर घेऊन आलेली. अवघी दोन महिन्यांची आहे. बाहुलीसारखी दिसते.
' क्या नाम रखा फिर इसका? '
' नमिता... '
' बडी cute है... ' जरा घरातलं वातावरण बदलल्यासारखं झालं तेवढ्या वेळात. नमिता मॅडम थोडा वेळ मस्ती करून आईच्या मांडीवर गाढ झोपलेल्या.
' चाचीजी बहोत खयाल रखती थी मेरा. ' सौम्याची नि आईंची गेल्या वर्षभरात चांगलीच गट्टी जमलेली. सौम्या आई होणार हे कळल्यावर स्वतःची मुलगी असल्यासारखे तिचे लाड पुरवलेले त्यांनी. बोलता बोलता सौम्याच्या डोळ्यात पाणी आलेलं. बोलता बोलता बराच वेळ गेला. नमिताबाईंची एक झोपही पुरी झालेली. निघावंच लागलं मग सौम्याला.
रात्रीचे बारा व्हायला आलेत आता. झोपावं.
१० फ़ेब्रुवारी २००३.
आज माझ्या नि शिशिरच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस. तीन वर्षांनंतरही त्या दहा फ़ेब्रुवारीच्या आणि त्यानंतरच्या दिवसांच्या आठवणी काल घडल्यासारख्या मनात ताज्या आहेत. आम्ही लग्नानंतर गोव्याला गेलो होतो.
' तुम्ही तिथे पोचल्यावर लगेचच व्हॅलेंटाईन्स डे आहे चौदा तारखेला... ' माझ्या ग्रुपमधल्या काही मैत्रिणींनी अगदी चार चारदा आठवण करून दिलेली.
' मग त्याला मी काय करू? ' असं मी विचारलं तेव्हा हताश होऊन कपाळावर हात मारलेला. खरंतर व्हॅलेंटाईन्स डे वगैरे प्रकार मला पटत नाहीतच. ' दिखाऊ प्रेमाचा सण ' वगैरे लेबलं लावतच असते मी त्या प्रकाराला. तरीही त्या १४ फ़ेब्रुवारीला मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला. शिशिरने अगदी फ़िल्मी स्टाईलने गुडघ्यांवर बसून माझा हात हातात घेऊन बोटात एक हिर्याची अंगठी चढवली. एरवी मी ' अरे कशाला आता एवढी महागाची अंगठी आणलीस? ' असं म्हणालेच असते. पण त्या दिवशी ते सगळंच इतकं अनपेक्षित आणि सुखद होतं की मला असं काही म्हणायचं भानही राहिलं नाही. माझ्या नाजूक बोटात शोभून दिसणार्या त्या अंगठीवर वारंवार नजर जात राहिली. आणि शिशिरच्या हसर्या चेहर्यावरही. ...
नवीन साडीची घडी मोडली आज. संध्याकाळी मन लावून तयार झाले. मरून रंगाचा नवीन कुर्ता घातलेला शिशिरही देखणा दिसत होता. गेलो त्या रेस्टॉरंटचा माहौलही सुरेख.. आत्ता थोड्या वेळापूर्वी परतलो. सौम्याच्या घरात जाग होतीच. सध्या नमिताचं ' झोपणार नाही... ' आंदोलन चालू असतं. तिला झोपवायच्या प्रयत्नात सौम्यालाच पेंग आलेली. दोघी बाल्कनीत होत्या.
' देखा दीदी... आधी रात हो गई और इसे अभी भी नींद नही आ रही... परेशान हो गई हूं. न खुद सोती है न मुझे सोने देती है... ' लॅच उघडून घरात आले. आमचं शांत, गप्प घर. आम्ही दोघंही घरात असलो तरी शांतताच असते बहुतकरून. मला एकदम काय झालं कोण जाणे...
' शिशिर, आपण मुलाचा चान्स घ्यायचा का आता? ' त्याचं ऐकून न घेता मी भराभर बोलत सुटले. ' आता आपलं ठरलंच आहे ना हैदराबादमध्ये काही वर्षं राहायचं? आपापल्या जॉब्जमध्येही बर्यापैकी स्थिरावलो आहोत आपण. मग काय हरकत आहे? नमिता.... ' शिशिर हसायला लागला.
' तरीच म्हटलं, आत्ता एकदम हा विषय कसा निघाला? तू म्हणतेस ते खरंय... मलाही छान वाटेल... ' त्याचं पुढचं बोलणं मला फारसं ऐकूच आलं नाही मग.
मी आमच्या बाळाच्या विचारांत पार हरवलेले... त्या विचारांनीही मला खूप छान वाटतंय आत्ता. डॉक्टरच्या appointments लगेच घ्याव्यात. पूर्ण चेक अप करून घ्यावा एकदा. नाहीतरी घरात आम्ही दोघंच! कुणीतरी तिसरं आलं तर जरा घरात चैतन्य येईल. छानशी मुलगी हवी पहिली, नमितासारखी... बाहुली. तिच्यासाठी काही काळ मी जरा करीयर बाजूला ठेवेन. बाप रे! केवढी पुढे पोचलेय मी! जरा आवरतं घ्यावं.
२० फ़ेब्रुवारी २००३
अपेक्षेप्रमाणेच नॉर्मल आले रिपोर्टस सगळेच. मन कसं आनंदाने मोहरून गेलंय. शिशिरचं आणि माझं बाळ... आईशी परवा बोलत होते तेव्हा हा विषय निघाला. तिलाही आमचा निर्णय कळल्यावर आनंद झाला. ' २८ चालू आहे गं तुला आत्ता. बरं झालं हा विचार केलास ते. तिशीच्या आत पहिलं मूल झालं तर बरंच.... ' शिशिरच्या आईंना हौस होती मुलांची. त्यांना नातवंडं बघायला मिळायला हवी होती. असो. शिशिरची चुलतबहीण, वैदेही उद्या हैदराबादला येतेय. उद्याची सुट्टी घेतलीच आहे. लगेचच वीकेंड. वैदेहीबरोबर जाम धमाल येते.. शॉपिंग, भटकणं, खाणं, गप्पा! सध्या आयुष्यात एक नवीनच चैतन्य आल्यासारखं जाणवतं. मी जरा जास्तच बोलकी झालेय गेल्या काही दिवसांत. शिशिरलाही जाणवलंय हे! माझ्या या उल्हसित मनःस्थितीमुळे तोही जरा जास्तच आनंदी आहे की काय असं वाटायला लागलंय. नमिताशी खेळायलाही मजा येते मग. आजकाल घरी असले की एकदातरी तिला घरी घेऊन येतेच. तिचं घरात असणं, दंगा करणंही सुखावह वाटतं. शब्दांत मांडता येणार नाही असं!
क्रमशः
Subscribe to:
Post Comments (Atom)

1 comments:
aprateem lihila aahe.....ajun yeude
Post a Comment