२१ जानेवारी २००४.
गेल्या बर्याच दिवसांत डायरीला हातही लावलेला नाहीय. शेवटची नोंद १३ ऑक्टोबर २००३ ची. शिशिरचा वाढदिवस. उसना उत्साह आणून तो दिवस साजरा केला. त्याच्या नि माझ्या आवडीचा स्वयंपाक केला खूप तास घालवून आणि डायनिंग टेबलवर बसल्या बसल्या माझ्या डोळ्यांतनं पाणी यायला लागलं,
' शिशिर... ' जेवण गेलंच नाही मग दोघांनाही. त्याच्या कुशीत शिरून मी रडत राहिले आणि तो काही न बोलता मला थोपटत राहिला, माझ्या केसांतून हात फिरवत राहिला. सगळं अन्न दुसर्या दिवशी मोलकरणीला देऊन टाकलं. तिला वाटलेलं आश्चर्य जाणवलंच!
आजची गतही काही वेगळी नाही. हे असं वारंवार व्हायला लागलंय. मनाला कशानेच उभारी येतच नाहीये.
' का असं वागतेयस राणी? ' शिशिरने विचारलेले प्रश्नही माझ्या मेंदूपर्यंत पोचत नाहीत आताशा. आजही संध्याकाळी तो आला तर मी दिवा न लावता अंधारात तशीच बसले होते.
' सुधा... '
' अं... '
' अशी काय करतेस, राणी? इतकी का हताश होतेयस इतक्यातच? '
' मग मी काय करू शिशिर? ' माझ्याही नकळत डोळे पुन्हा भरभरून वाहू लागले. ' आपल्याला मूल का होत नाहीये शिशिर? दहा वेळा आपण वेगवेगळ्या टेस्ट्स करून घेतल्या. तुझ्यात कसलाच दोष नाही आणि माझ्यातही... शिशिर, हे असह्य होतंय मला आता... वाट बघणं असह्य होतंय मला. '
' सुधा, आपल्याला डॉक्टरांनी काय सांगितलंय? काही काही केसेसमध्ये लागू शकतो वेळ. आपण म्हटलं नि झालं अशी गोष्ट आहे का ती? '
' शिशिर, इतका? इतका वेळ? काहीतरी प्रॉब्लेम आहे... नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. '
' शांत हो पाहू आधी... चल, तयार हो. आपण कुठेतरी बाहेर चक्कर मारून येऊ आणि बाहेरच काहीतरी खाऊ. चल... बरं वाटेल तुला. ' बाहेर गेल्यावरही मन लागलं नाही कशातच! त्याच्या कुठल्याच बोलण्याकडे लक्ष नव्हतंच माझं! तोही गप्पच झाला मग. एकमेकांशी चकार शब्द न बोलता आम्ही एका हॉटेलात जेवलो. वेटरलाही नवल वाटलं असावं बहुधा!
घरी आल्या आल्या शिशिर माझा हात हातात घेऊन म्हणाला. ' सुधा, मूल होत नाहीये म्हणून किती खंतावतेयस. व्हायचं तेव्हा होईल गं राणी मूल. तोवर एकमेकांना आपण आहोत ना! ए, इकडं बघ माझ्याकडं... मी आहे ना तुझ्यासोबत! ' डोळ्यांतलं पाणी त्याच्यापासून लपवायचा निष्फळ प्रयत्न करत मी हट्टाने खिडकीतून लांब कुठेतरी बघत राहिले. शून्यात!
२१ मार्च २००४.
गेल्या नोंदीनंतर बरोबर दोन महिने. अजूनही परिस्थिती वेगळी नाही. गेल्या वर्षी या सुमारास किती आनंदी होते मी. सगळं कसं सुंदर वाटत होतं. पण आज? एका वर्षात माझ्यात जमीन अस्मानाचा फरक पडलाय. जगण्यातला रस संपलाय जणू! शिशिर मला सारखं समजावून थकून गेलाय. माझ्याशी फारसा बोलतही नाही तो आताशा. सध्या उशिराच येतो ऑफिसातनं. अधून मधून आम्ही बाहेर वगैरे जातो फिरायला, पण त्यातही काही रस वाटत नाही. आई बाबांनीही मला खूप समजावलं. पण परिणाम शून्य!
सौम्या तशी रोजच येते माझ्याशी बोलायला. तिलाही माझी चिंता लागून राहिली असावी. नमिता माझ्या आसपास असली की मला जरा बरं वाटतं. सौम्या तिला आवर्जून बरोबर आणते मग... चांगली आहे सौम्या! तिचा खूप आधार वाटतो सध्याच्या या काळात.
परवा रस्त्यावर एके ठिकाणी पोस्टर विकणारा मुलगा बसला होता. त्याच्या पोस्टर्सच्या चळतीमध्ये सगळ्यात वर एका गोंडस बाळाचं पोस्टर.
' ले लीजिये नं मॅडम... सिर्फ तीस रुपए का है. '
' नको बाबा... मी काय करू ते पोस्टर घेऊन? त्रास होईल.... ' त्याला मराठी कळणार नाही, हे जाणवलंच नाही मला. तो माझ्याकडे गोंधळल्यासारखा थोडावेळ बघत राहिला आणि लगेच दुसर्या गिर्हाईकाकडे वळला.
मी पाय ओढत घरी आले. गेले काही दिवस एक विचार मनात जोम धरतोय. हे सगळं मी थांबवायला हवंय आता. मला कंटाळा आलाय या स्थितीचा, आमच्या घरातल्या निःशब्द वातावरणाचा... मूल न होण्याचं दुःख मनाआड करता येणं शक्यच नाहीये, पण मी नॉर्मल वागायला हवंय. जमेल का पण?
२३ मे २००४.
सध्या जरा बरं चाललंय. रूटीन व्यवस्थित होतंच आधीही. आता फारसा विचारच करत नाही कुठल्याच गोष्टीचा. शिशिरलाही जरा बरं वाटतंय त्यामुळे. डायरी नियमित लिहितेय सध्या. जरा जास्तच तपशीलवार.
अगदी कुणाकडे जेवायला गेलो तेव्हा यजमानीण बाईंनी काय ड्रेस घातला होता, इथपासून शेवटी दिलेली कॉफी कशी अगदीच बेचव होती इथपर्यंत. परवा शिशिरने सहज म्हणून मी डायरी लिहिताना डोकावून बघितलं आणि हसायलाच लागला... कितीतरी दिवसांनी.
' देशपांडे बाईंचा नेकलेस त्यांच्या साडीला अज्जिबात मॅच करत नव्हता???? आणि बघू... बघू... हे काय? मेहता त्यांच्या चमचमणार्या हिरव्या फ़्लूरोसंट साडीत हिरव्या बेडकासारख्या दिसत होत्या???? सुधा, बाकी डायरी पण वाचू दे नं. भलतीच रंजक वाटतीये.. ही ही ही... ' मला खूपच बरं वाटलं.
त्याच्या हसण्यात सामील होत मीदेखील त्याला माझ्या डायरीतल्या वेगवेगळ्या नोंदी वाचून दाखवायला लागले. एरवी कधी माझी डायरी दुसर्या कुणाला ऐकवणं तर सोडाच, दृष्टीसदेखील पडू दिली नसती... पण आजची गोष्ट वेगळी होती. आज पुन्हा एकदा आयुष्य नॉर्मलला आल्यासारखं वाटतंय.
१० फ़ेब्रुवारी २००५.
कालचा दिवस मस्त गेला. संध्याकाळी शिशिर जरा लौकरच घरी आला आणि आला तेही एकदम खुशीत.
' मला माझ्या performance बद्दल अवॉर्ड मिळालं, सुधा. I am so happy. चल आज कुठेतरी जाऊया. सेलेब्रेट करूया. चल तयार हो. '
आरशासमोर उभी राहून केस ठाकठीक करताना जाणवलं, की हे ही बर्याच दिवसांनी. अशा छानपैकी किती दिवसांत तयार झालोच नाहीओत आपण. मग मुद्दाम अगदी वेळ घेऊन तयार झाले.
' कशी दिसतेय मी? ' माझा हा आवाजही बर्याच काळाने आल्यासारखा वाटला मला. शिशिरच्या डोळ्यांत पसंतीची पावती वाचता येत होती. बर्याच दिवसांनी रेस्टॉरंटमध्ये आम्ही दोघं भरभरून गप्पा मारत होतो, कुठेतरी फिरायला जायचे बेत आखत होतो.... आज कळलं की पुढल्या आठवड्यात तो सगळा समारंभ आहे. पार्टी आहे त्याच्या कंपनीत आणि मलाही आमंत्रण ( अर्थात!) आहेच. त्या दिवशी काय घालावं वगैरेची तयारी शिशिरच्या चेष्टेला न जुमानता मी आत्तापासूनच सुरू केलीये.
क्रमश:

0 comments:
Post a Comment