१७ फ़ेब्रुवारी २००५.
आज मी खूप आनंदात आहे. आजचा समारंभ, त्यानंतरची पार्टी... आणि हो मिसेस कुलकर्ण्यांची भेट, सगळ्या चांगल्या गोष्टी एकदमच घडून आल्यायत.
दृष्ट लागण्यासारखं झालं अवॉर्ड फ़ंक्शन. काळ्या सुटातला शिशिर देखणा दिसत होता. अवॉर्ड मिळाल्याचा आनंद त्याच्या छोटेखानी भाषणातल्या शब्दाशब्दातून ओसंडत होता अगदी. त्याच्या सहकार्यांची काही भाषणं, त्याच्या बॉसचंही भाषण झालं मग.
नंतरच्या पार्टीत अचानकच मिसेस कुलकर्ण्यांची भेट झाली. मला फार आवडतात त्या. मी हैदराबादला नुकतीच आले होते तेव्हा आम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडेच गेलेलो. मि. कुलकर्णी शिशिरच्या कंपनीतून निवृत्त झालेले काही वर्षांपूर्वी. तरी त्यांची, शिशिरची चांगलीच ओळख होती. मध्यंतरी कुलकर्णी काका काकू जर्मनीला त्यांच्या मुलाकडे गेल्याने भेट झालीच नव्हती.
' काकू, तुम्ही? ' मी हरखून म्हटलं. आमच्या गप्पा सुरू झाल्या. मधल्या काळातले अपडेट्स... त्या त्यांच्या नातवाबद्दल सांगत होत्या.
' सुधा, लग्नाला पाच वर्षं झाली ना तुझ्या? मग मुलांचं वगैरे... ' इतर कुणी असतं तर मी नक्कीच ' तुम्हाला का नसत्या पंचायती? ' म्हटलं असतंच! चिडून किंवा विनोदाने. पण कुलकर्णी काकूंसमोर असं वागता येत नाही. मी मान खाली घालून गप्प उभी राहिले.
' का गं, काय झालं? ' त्यांच्या आवाजातला तो काळजीचा स्वर.... मला रडू आवरणं कठीणच झालं मग. ' कळलं पोरी... पण असं निराश होऊन चालायचं नाही. बरं ऐक. मी तुला डॉक्टर अवस्थींचा पत्ता देते. पुण्यात आहेत ते. त्यांना कन्सल्ट करून बघ. फार जुने आणि निष्णात डॉक्टर आहेत ते.... '
शिशिरच्या कानावर ही गोष्ट घातली. ' ओके. जाऊयात आपण पुण्याला. पण एक प्रॉमिस कर. या प्रयत्नांना यश आलं नाही तर पुन्हा खिन्न व्हायचं नाही. पूर्वी वागलीस तसं वेड्यासारखं वागायचं नाही. कबूल? '
मी ' हो ' म्हटलं. मनात पुन्हा कुठेतरी आशा पालवली होती.
२२ एप्रिल २००५.
डॉ अवस्थींची ट्रीटमेंट सुरळीत सुरू आहे. छान वाटतंय सध्या. डॉ एकदम छान आहेत. मिस्कील आजोबांसारखे दिसतात. संपूर्ण केस पांढरे, डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा... डोळ्यांवर पेक्षा त्याला नाकावरचा चष्मा म्हणायला हवं. कारण तो नाकावरच असतो नेहमी.
बोलतात भरपूर. आणि आपण काही सांगायला लागलो तर ऐकूनही घेतात patiently. पहिल्या अपॉईंटमेंटच्या वेळी गेल्या गेल्याच त्यांनी ' सुधा, काहीतरी छोटासा प्रॉब्लेम झालाय नं? बघूयात बरं आपण. ' असं मला पाहून म्हटलं होतं. त्यांचा तो आश्वासक स्वर आणि त्यातून जाणवणारा त्यांचा आत्मविश्वास. मनावरचं सगळं मळभ त्या शब्दांनीच दूर झाल्यासारखं वाटलं.
त्यांनी सगळे रिपोर्टस पाहिले बारकाईने. ' सुरू करूयात हां आपण ट्रीटमेंट. लगेचच! आणि त्याआधी एक दोन छोट्या छोट्या टेस्ट्सही करून घेऊ. काय? ' मी अत्यानंदाने ' हो ' म्हणून मान डोलावली.
'Everything is going to be alright.' हे त्यांचं लाडकं पालुपद आहे. ते त्यांच्या तोंडून ऐकताना १०० टक्के खरं वाटतं. त्यांच्या प्रत्येक appointment मध्ये मला मनाने ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं. आमच्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल, असा विश्वासही कधी नव्हे तो वाटायला लागलाय. काल झोपताना शिशिरच्या गळ्यात हात टाकून त्याला सांगितलं, ' आपल्याला पहिली मुलगी झाली की तिचं नाव ईशानी ठेवूयात हं आपण. '
’अचानक हे काय?’ म्हणून गोंधळलेल्या त्याच्या चेहर्याकडे बघत मी त्याच्या कुशीत घुसून हसत हसत झोपी गेले.
२१ जून २००५.
मी किती आनंदी आहे, हे शब्दांत लिहिताच येत नाहीये. शिशिरही.... तो तर आनंदाने वेडावून गेलाय. बातमी कळली तेव्हा डॉ अवस्थींसमोर बसून ढसाढसा रडले मी. आयुष्यातली, निराशेने व्यापलेली ती काळीकुट्ट दोन वर्षं एकदम नाहीशीच झाली. स्वतःच्या भावना कायम ताब्यात ठेवणार्या शिशिरच्या डोळ्यांतही पाणी आलेलं.
'Now take good care of yourself.' डॉक्टर अतिशय मृदू स्वरात म्हणाले.
क्लिनिकमधून बाहेर पडल्या पडल्या आईला फोन लावला. मला आनंदातिशयानं बोलताही येत नव्हतं काही.
हैदराबादला परतल्यानंतर पहिली गोष्ट केली ती म्हणजे नोकरीचा राजीनामा दिला. नकोच ते कामाचं प्रेशर, हेक्टिक रूटीन, ती धावपळ.. मला माझ्या बाळाच्या बाबतीत कुठलाही चान्स घ्यायचा नाहीये. आई आलीये सध्या हैदराबादला. तीच माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेतेय. इथल्या एका डॉक्टरांकडे नियमित चेक अप सुरू आहेत. शिशिरही ऑफिसातून लौकरच येतो सध्या. माझ्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवतो तो. माझ्याशी, आईशी गप्पा मारत बसतो.
परवा माझ्यासाठी खास Mom to be ने घालायचे कुठलेसे महागडे, ब्रॅंडेड कपडे घेऊन आला. ' खरंतर तुला गरज नाहीये याची. तू अशीच खूप सुंदर दिसतेयस. ' तो मला जवळ घेऊन म्हणाला.
नमिताला बाळ पहायची भयंकर उत्सुकता लागलीये. रोज ती सौम्याबरोबर येऊन मला भेटून जाते. तीन वर्षाची झाली ती आता... भयंकर चौकस झालीये आणि सारखी प्रश्न विचारत असते.
' चाची बेबी का नाम क्या है? '
' अभी तक उसका कोई नाम नही रखा... '
' तो कब रखना है? ' तिचे प्रश्न संपता संपत नाहीत. मजा वाटते पण त्या प्रश्नांची.
परवा सौम्याने माझ्यासाठी एक ताईत आणला होता. ' दीदी बांध लो. किसी की नजर नही लगेगी आपको. अभी तो बुरे दिन टले है आपके. प्लीज, बांध लो. ' तिच्या स्वरातली कळकळ जाणवून मी तो बांधून घेतला खरा... पण तिला सांगितलंच...
' मै इन सब चीजोंपे विश्वास नही करती सौम्या. ' ओघाओघात मग तिला टुणकीचीही गोष्ट सांगितली. तिला ते फारसं रुचलं नसावं. ' चलो... अभी तो सब ठीक हो रहा है. टेक केअर दीदी. '
मलाही ते दिवस पुन्हा आठवले मग. ती त्या वाड्यातली अस्वस्थ करणारी जाणीव... त्या परिसराचा प्रभावच तसा होता बहुधा. त्यादिवशी टुणकीहून परतताना वाटलेली रमेची भीती.... या असल्या गोष्टींवर कधी विश्वास ठेवला नाही आपण. तिथे गेलो तेही शिशिरच्या आईंच्या इच्छेपोटी. पण शेवटी आपल्या बुद्धीला पटलं तेच केलं. जाऊ दे. त्या गोष्टीचा फार विचार करायला नको आता.
क्रमश:
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment