१९ मे २००२.
जायचं ठरलं शेवटी. फार लांब नव्हतं. ' इथून जवळ डोंगरात एक वारी नावाचं ठिकाण आहे. त्याच रस्त्यावर अलिकडं इनामदारांचा पूर्वीचा वाडा आणि सतीच्या देवळाची जागा आहे. ' श्रीधर सांगत होता. त्याच्याच गाडीतून आम्ही निघालो. शिशिर श्रीधरशी गप्पा मारण्यात रंगला होता. श्रीधर उत्साहाने आजूबाजूला दिसणार्या शेतांबद्दल, पिकांबद्दल त्याला माहिती सांगत होता.
लौकरच रस्त्याच्या उजव्या बाजूला एक छोटी वाट आतपर्यंत गेलेली दिसली. थोडं अजून पुढे गेल्यावर एका वाड्याची ढासळलेली दगडी कमान दृष्टिपथात आली. वाड्याचेही थोडेच अवशेष शिल्लक राहिलेले. पावसाळ्यात आजूबाजूला नुसतं रान माजत असणार. सध्या उन्हाळा असल्याने नुसतं खुरटं, वाळकं गवत आसपास दिसत होतं.
' वाडा बघायचा का आपण? ' मी शिशिरला विचारलं. त्याने होकार दिला. विकास आमच्यासोबत गाडीतच होता, तो तिथं धडपडेल म्हणून विकास श्रीधर गाडीतच थांबले. आम्ही त्या कमानीखालून वाड्यात प्रवेश केला. मूळ वाडा दुमजली असावा. एकीकडे काही खोल्या शिल्लक राहिलेल्या दिसत होत्या. नक्षिदार दरवाजे असावेत पूर्वीचे. आत्ता मात्र एखाददुसरं तग धरून राहिलेलं फळकूट... त्यावरची नक्षी आता दिसेल ना दिसेल अशी.. आतमध्ये प्रशस्त चौक होता. मध्ये दगडी कारंजं असणार. शिशिर आणि मी न बोलता सगळी वास्तू बघत होतो. ' वाड्याची डागडुजी कधीच का केली नाही, देव जाणे! ' शिशिर स्वतःशीच बोलल्यागत बोलला.
' पार्वतीने इथे, या वाड्यातच विष पिऊन जीव दिला ना? तिचा आत्मा वावरतो म्हणे इथे... ' सकाळीच आशाने मला सांगितलेलं... मी त्याला हे सांगितलं तसा तो जोरात हसला. त्या शांततेत तो आवाजही केवढा विचित्र वाटला.
' सुधा, काय चाललंय काय तुझं? आधी सतीच्या दर्शनाचा हट्ट, मग या वाड्यात भूत आहे, वगैरे... '
' ए, आशाने जे मला सांगितलं तेच सांगतेय तुला. माझा विश्वास नाही असल्या गोष्टींवर. पण इतर लोकांचा असावा, म्हणून या वाड्याची डागडुजी कधीच झाली नाही, आय थिंक. '
' हं... ' बाजूला एक जिना होता. पायर्या बर्यापैकी अवस्थेत होत्या; म्हणून आम्ही वर चढून गेलो. समोरच्या बाजूचा भाग बराच ढासळला होता. तिथून, एका भगदाडातून मला रमेचं देऊळ स्पष्ट दिसलं. फार लांब नव्हतं ते. कुतुहल म्हणून आणखी थोडं पुढे जाऊन बघायला लागले. आणि का कोण जाणे अचानकच मला वाटलं... ही नक्कीच पार्वतीची खोली होती. रमा सती गेल्यावर तिचं बांधलेलं देऊळ पार्वतीला सतत इथून दिसत असणार. ते सतत तिच्या नजरेसमोर असणार... कदाचित फक्त देऊळ नव्हे तर रमाही.... पार्वतीच्या आत्महत्येचं कारण हे आहे....
मला माझ्याच मनात आलेल्या ह्या विचारांचं नवल वाटलं. माझा असल्या गोष्टींवर अजिबातच विश्वास नव्हता. कधी नव्हे ते माझ्या डोक्यात विचित्र विचार चाललेले.... ' चल जाऊया... आपल्याला उशीर होईल नाहीतर. ' शिशिर जवळ येऊन म्हणाला.
' शिशिर, रमेचं दर्शन घ्यायला नको असं वाटतंय आता. आपण घरी परत जाऊया? ' तो गोंधळून माझ्याकडे बघत राहिला. ' मला माहितेय, या एकाच गोष्टीसाठी आपण हैदराबादहून इथे आलो. पण काल सगळी हकीकत ऐकल्यापासून मला तिचं दर्शन घ्यायची, तिची पूजा वगैरे करायची इच्छा उरलेली नाही. ' त्याने काहीतरी बोलायला तोंड उघडलं पण मला काही बोलायचा विचार बदलला असावा.
' चल जाऊया. इथे येऊन श्रीधर वगैरेंसारखी मंडळी भेटली, हेही नसे थोडके. आज संध्याकाळी निघायचं मग परत जायला? ' मी हो म्हणून मान डोलावली. आम्ही पायर्या उतरून भराभर गाडीकडे गेलो. विकास मागच्या सीटवर गाढ झोपला होता. श्रीधर एका म्हातार्या माणसाशी काहीतरी बोलत उभा होता.
' चलायचं मंदिरात? आताशा कुणी फारसं जात नाही म्हणा तिथं... हे तिथले पुजारी आहेत. हेच तिथं पूजाअर्चा करतात आणि आसपासच्या परिसराची देखभाल करतात... ' मी त्यांना नमस्कार केला. त्यांच्याशी जुजबी बोलणं चाललं होतं. ओघात ते एकटेच राहत असल्याचं कळलं. त्यांना इथे राहावतं तरी कसं, माझ्या मनात विचार आला. त्या वाड्याभोवतालची शांतता, तो वाडा, रमा आणि पार्वतीची कहाणी... सगळ्या गोष्टी मला प्रचंड अस्वस्थ करत होत्या.
' येताय ना मंदिरात? ' श्रीधरच्या आवाजाने मी भानावर आले. मंदिरात नाही जायचं मला, मनात फक्त हाच एक विचार.... मी नकारार्थी मान डोलावली. तोही बुचकळ्यात पडला. शिशिर इनामदारांची बायको, जरा विक्षिप्तच आहे, हे त्याला पटलं असावं. आम्ही घरी जायला निघालो.
' आज्जींना हे सांगू नका, श्रीधर. त्यांना वाईट वाटेल. ' मी म्हटलं. घरी आलो, जेवणं वगैरे आटोपली. आम्ही संध्याकाळी निघणार होतो. जरा आराम करायला म्हणून मी आणि शिशिर वरच्या खोलीत पहुडलो होतो.
' आता सांग, का बरं जायचं नाही म्हणालीस ते? सविस्तर सांग. ' मी त्याला सांगितलं सगळं. मला त्यावर दर्शनाला जाऊ नये असं का वाटलं तेही... तो डोळे मिटून ऐकत होता. संध्याकाळी आम्ही निघालो. श्रीधर आम्हाला गाडीने वरवट बकालपर्यंत सोडणार होता. माझं डोकं जरा दुखत होतं म्हणून मी मागच्या सीटवर डोळे बंद करून बसलेले.... त्यातच कधीतरी पेंग आली असावी.
आणि मला पुन्हा रमेचं स्वप्न पडलं. गेल्या वेळी पडलेलं तसंच... अं हं. एक फरक होता. आत्ता रमेच्या चेहर्यावरचे भाव कृद्ध होते. मी पुन्हा दचकून जागी झाले. अंग घामेजून गेलं होतं. आत्ताच पुन्हा जावं का देवळात? एक विचार चाटून गेला मनाला. पण पहिल्यांदाच आयुष्यात कशाचीतरी भीती वाटली. त्या वाड्याची, त्याच्या आसपासच्या निःशब्द शांततेची, रमेची आणि पार्वतीचीही....
क्रमशः

2 comments:
हे 'क्रमशः' प्रकरण मला 'अज्याबात' आवडत नाहीय. तू खरंच क्रमशः लिहिते आहेस की आधीच लिहून ठेवलंय आणि रोज थोडं थोडं छापतेयस? हा काय छळ?!! लिही लवकर!
मेघना, आधी लिहिलेली आहे पण इतक्या कालावधीनंतर पुनर्प्रकाशित करताना वाचून बघतेय पुन्हा. बदल करायचे असतील तर ते करतेय म्हणून ’क्रमश:’
वीकेंडपर्यंत संपेल सगळी. बाकी धीर ठेवून वाचतेयस याबद्दल धन्यवाद. :-)
Post a Comment