Subscribe

RSS Feed (xml)

Powered By

Skin Design:
Free Blogger Skins

Powered by Blogger

Saturday, May 24, 2008

सती - ९ (शेवट)

........ थोडीफार फळं, डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेऊन शिशिर घरात शिरला. घरात सर्वत्र भयाण शांतता दाटलेली.... हिवाळ्यातला लहान झालेला दिवस मावळतीला लागलेला. सुधा औषधांच्या गुंगीत गाढ झोपली होती.
.... ' वाढ झालेली नाहीये बाळाची आणि.... ' पुढचं बोलणं त्याला कळलंच नाही.
दोन आठवड्यांपूर्वीची रात्रीची धावपळ त्याला आठवली. रात्री बाराला त्याने सुधाला हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं. डॉक्टरांनी बाळाबद्दल सांगितलं मात्र... तो मटकन खालीच बसला.
' सुधाला कसं सांभाळू मी डॉक्टर? ती वेडी होईल.... हेल्प मी... माझ्यात बळ नाहीये आता. ' तो डॉक्टरांसमोर ढसाढसा रडायला लागला.

सुधा शुद्धीवर आली तेव्हा तिने आकांत केला....

' आय लॉस्ट माय बेबी, शिशिर... मला जगायचं नाहीये..... मला मरू द्या. डॉक्टर, मला जगायचं नाहीये. डॉक्टरऽऽऽ ' तिला जवळही घ्यायचं त्राण न उरलेला तो डॉक्टर नर्सेसची धावपळ पाहात एका कोपर्‍यात सुन्न बसून राहिला.....

नुकतंच घरी आणलं होतं त्याने तिला.
' उठली होती का? ' सुधाच्या आईंनी नकारार्थी मान हलवली.
' मी बसतो काहीवेळ तिच्याजवळ... '
' बरं, मी जरा स्वयंपाकाचं बघते. ' त्या उठून बाहेर गेल्या. सुधाच्या डोक्यावरून हात फिरवत तो निःशब्द बसून राहिला.
' ईशानी... ' सुधाचा आवाज ऐकून तो चमकला.
' राणी बरं वाटतंय का? ' तो तिच्या जवळ जाऊन म्हणाला.
कसला भकास दिसत होता सुधाचा चेहरा. विस्कटलेले केस, निर्जीव डोळे...
' काही हवंय का, राणी? '
' तिने आपल्या बाळाला मारलं... ' ती अस्फुट स्वरात म्हणाली.
' अं... ' शिशिरला काहीच अर्थबोध झाला नाही.
' रमा... तिने मारलंय आपल्या बाळाला शिशिर.... तुला समजत कसं नाही? सगळे म्हणत होते ते खरंय. ती आहे... इनामदारांवर लक्ष ठेवून आहे. तिचा अपमान सहन होत नाही तिला... ' एवढ्या बोलण्यानेही तिला धाप लागली.

शिशिरने तिला घट्ट जवळ घेतलं, ' राणी, शांत हो.. हे काय बोलतेयस? तुझी तब्येत नाजूक झालीये खूप... औषध.... '

सुधा स्वतःवरचा ताबा सुटल्यासारखी किंचाळलीच... ' तुला कळत कसं नाहीये शिशिर... तिने... तिनेच... हे घडवून आणलं सगळं.... तिनेच... चल... आत्ताच्या आत्ता आपण टुणकीला जाऊ... प्लीज चल... मला आई व्हायचंय शिशिर... मला आई व्हायचंय... तिच्यासमोर नाक घासेन मी... काय हवं ते करीन.. चल ना... चल ना! ' ती ओक्साबोक्शी रडायला लागली.

.... ' त्यांचं वाढलेलं वय, आधीची काही complications यामुळे हे झालेलं असू शकतं. आत्ता त्यांनी सध्याच्या परिस्थितीतून recover होण्याची गरज आहे. पुढेही योग्य काळजी घेतली तर त्या आई होऊ शकतात. ' डॉक्टरांनी त्याला बरंच समजावून सांगितलं होतं. ते त्याला हळू हळू सुधाला समजावून सांगायचं होतं.
' सुधा... असल्या गोष्टींवर आपला कधीतरी विश्वास होता का राणी? डॉक्टर म्हणाले की काही प्रॉब्लेम्स.... ' त्याचं बोलणं तसंच राहिलं....

' मला तिथं घेऊन चलऽऽऽ.... ' सुधा विचित्र किंचाळली. ' ऐक माझं... मला मूल हवंय! खरा प्रॉब्लेम तुला कळत नाहीये का? नाहीये का कळत? रमा.... कोप... सती.... ' सुधाची शुद्ध हरपली.

बधीर झाल्यासारखा शिशिर तिच्याकडे पाहात तिथेच थिजून बसून राहिला.

समाप्त.

5 comments:

Meghana Bhuskute said...

सुंदर.

Mandar Behere said...

सुंदर, पण तितकीच अस्वस्थ करणारी आहे ही कथा. I was hopeful to have an happy ending, but :(

कोहम said...

Mastach...avadali..in fact this sounds like a greta plot for a play.

Anand Sarolkar said...

Nice but depressing

Quality Tale said...

मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!

दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!


आपला,

अनिरुद्ध देवधर