Monday, July 30, 2012

'पैलतीर'इष्टाईल: जावई इन हवाई


गेल्या महिन्यात आम्ही लेक-जावयाकडे हवाईला विमानाने आलो. हे अमेरिकेतले सगळ्या राज्यांमधील नवीनतम राज्य आहे व बेटांनी बनलेले आहे. त्यामुळे तिकडे खूप बीच आहेत. तिकडे सगळे लोक बीचवर जातात व गळ्यात ऑर्किड फुलांची माळ घालतात. कपडे पुरेसे घालतातच, असं नाही. आमच्या जावयांनी क्रेडिट कार्डांची माळ घातली होती. क्रेडिट कार्ड ही अमेरिकेतली आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट आहे. जावयांकडे जगातील प्रत्येक प्रख्यात बँकेचे क्रेडिट कार्ड आहे, त्यामुळे ती माळ घालून ते सगळ्या लोकांत उठून दिसत होते. मी वाळूत बसले, तर मला बसूनही दिसत होतेच.

आमचे जावई श्री. सुखमल मोटवानी इंजीनियरिंग कॉलेज या प्रसिद्ध कॉलेजातून बीई झाले व त्यांनी वरणगाव येथे कूलसॉफ्ट ही सॉफ्टवेअर कंपनी जॉइन केली. तिथे त्यांना फास्ट कोडिंग आणि डोळे बंद करून कोडिंग या स्किलसाठी सलग दोन वर्षं बक्षीस मिळाले. त्यांची बदली आळंदी(देवाची) येथे झाली असताना आमची बबडी त्यांना भेटली. आळंदीसारख्या शुभ स्थळी असल्याने त्यांनी घरच्यांची परवानगी घेण्यात वेळ न घालवता ताबडतोब लग्न केले. त्यावरून आमचे हे खूप नाराज झाले होते. त्याच काळात तळपायाला भेगा पडण्याचा आजार झाल्याने मी बिछान्यावर पडून होते. या कठीण काळात जावयांनीच आमची फोनवरून सतत विचारपूस केली व माझ्यासाठी खास अ‍ॅक्युप्रेशर चपला व यांच्यासाठी इंपोर्टेड ब्लडप्रेशर गोळ्या त्यांनी आवर्जून भेट म्हणून पाठवल्या. बबडीच्या पायगुणाने त्यांचे प्रमोशन होऊन ते हवाईला आले. त्यांनी तिथून आवर्जून यांना पाठवलेल्या 'आय लव्ह हवाई' टीशर्टामुळे सासरा-जावई दुरावा खूपच कमी झाला व आम्ही हवाई ट्रिपसाठी आलो.

आम्ही खास हवाईत आलो म्हणून चिनी रेस्टॉरंटात गेलो. तिथे आम्हांला काही ते चिनी लिपीतले नाव वाचता आले नाही. पण जावयांनी घडाघड वाचले आणि ऑर्डर घ्यायला आलेल्या वेटरला विचारले - "parlez-vous francais?"
तेव्हाच वेटरला आकडी आली. (तो दुष्ट म्यानेजर म्हणे, तुमच्या जावयांच्या भयंकर प्रश्नामुळेच आली. कुजका मेला!) तर जावयांनीच त्याला प्रथमोपचार केला. त्यावर त्याने आम्हांला नूडल खायच्या बांबूच्या काड्या फुकट दिल्या. ही अजून एक अमूल्य भेट आम्हांला जावयांमुळेच मिळाली. (माझ्या लेकीची पुढच्या महिन्यात डिलिव्हरी आहे.) त्याआतच नायगारा उरकून घ्यायला आम्ही जाणार आहोत, जावयांनी त्यांच्या एअरलाईनमधल्या मित्राच्या ओळखीने बिझनेस क्लास तिकीटं काढली आहेत. ते खूपच काळजी घेतात आमची!(मित्र नव्हे, जावई!) आमच्या ह्यांना जरी बबडीने लव्हम्यारेज केलेले आधी आवडले नव्हते, तरी आता मात्र हे पूर्ण निवळले आहेत.

असे हे हवाई आणि असे आमचे जावई!

Friday, July 06, 2012

आर्यन इन्व्हेजन थिअरी

सदर संशोधन 'घरोघरी संशोधक बनती' आणि 'घरच्याघरी करा संशोधन' ही दोन पुस्तके वापरून केले आहे. या पुस्तकांच्या मदतीने कसलेही संशोधन घरबसल्या करता येते.

आर्य उत्तरेकडून निघाले. उत्तरेकडून म्हणजे उत्तरा नावाच्या बाईकडून नोहे; उत्तर दिशेकडून. उत्तर ध्रुवावर तेव्हा सहा महिन्यांची रात्र झाली होती. त्यामुळे 'एकच (ध्रुव)तारा समोर आणि पायतळी अंधार' अशी आर्यांची स्थिती झाली होती. त्यामुळे ते चालत चालत निघाले. त्याकाळी विमाने, आगबोटी नव्हत्या. पण सुदैवाने खंड अखंड होते (हिते कायतरी ग्रॅमॅटिकल मिष्टिक हाय, पण ते सोडा.) त्यामुळे उ. ध्रुवावरून चालत चालत दक्षिण ध्रुवापर्यंत जाऊन पेंग्विन पाहून परतता येई. खेरीज 'सबै भूमी गोपाल की' असे कुणीतरी सांगून गेले होते आणि हा गोपाल बीजगणितातल्या 'क्ष'सारखा असल्याने कुणालाच कधी दिसला नव्हता. त्यामुळे देश, पास्पोर्ट, व्हिसा, वगैरे भानगडीही नव्हत्या.(असत्या, तर बिचार्‍या आर्यांची पंचाईत झाली असती, कारण उ. ध्रुवावर रात्र झाली की इमिग्रेशन ऑफिस सहा महिन्यांसाठी बंद होई.)
(गोपालसंदर्भात जास्तीचे संशोधनः अनेक वर्षे गेली तरी भूमी क्लेम करायला गोपाल काही येत नाही पाहून स्थानिक लोकांनी जमीन वाटून घेतली व अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सोविएत युनियन, दुल्हन के माथे की बिंदिया आय लव्ह माय इंडिया, इ. देश व देशभक्तीपर सिनेमे निर्माण केले.)

इकडे आर्य चालतच होते. शिकार करून जेवत होते. सततच्या चालीला कंटाळले होते. मग त्यांना हिमालयाचा पट्टा लागला. अजून हिमालयाला घड्या पडल्या नव्हत्या, त्यामुळे तो फ्लॅट होता.* आर्यांनी तो सहज ओलांडला व ते दिल्लीत येऊन पोचले. पराठेवाल्या गल्लीतून येणार्‍या वासांनी त्यांची भूक खवळली आणि 'यल्गार हो! हर हर महादेव! जय एकलिंगजी की! टूट पडो!' अशा घोषणा देत ते जेवणावर तुटून पडले. तेव्हा लग्नांचा सीझन चालू होता. त्यामुळे दिल्लीत रोज जेवणावळी असत. आर्य दिल्लीत नवे असल्याने त्यांना प्रायव्हेट फंक्शन्स, पब्लिक रेस्टॉरंट्स, वगैरे काही कळत नसे. जेवणाचा वास आला की, ते तिथे घुसून फडशा पाडीत. यालाच पुढे आर्यन इन्व्हेजन म्हटले जाऊ लागले.

काही काळाने आर्यन कबिल्याचा सरदार म्हटला, 'ड्यूड्स एन बेब्स, पॅक योर बॅग्स.. इट्स टाईम टू गो बॅक..' तसे सगळे आल्या वाटेने निघाले. पाहतात तो काय, तोवर हिमालयाला घड्या पडल्या होत्या नि तो अगदी 'परबत वो सबसे उंचा, हमसाया आसमाँ का' झाला होता.* कायम फ्लॅट भूभागावर राहिल्यामुळे आर्यांमध्ये १००पैकी १०१ जणांना व्हर्टिगो! त्यामुळे ते बिचारे परत जाऊच शकले नाहीत. अशी आहे आर्यन इन्व्हेजन थेरी!$

* - इथे मी पाच गोगलगाई व सतरंजी वापरून प्रयोग केला. आधी सतरंजी फ्लॅट असताना गोगलगाई आरामात इकडून तिकडे गेल्या. मग सतरंजीला घड्या घातल्यावर मात्र तिकडून इकडे येऊ शकल्या नाहीत. मात्र या प्रयोगामुळे थेरीला 'नॉट टेस्टेड ऑन अ‍ॅनिमल्स' हा शिक्का मिळाला नाही.

$ - आतापावेतो अशीच आहे. उद्या सारुकखानाचा मुलगा सिनिम्यात आला की पुन्हा नव्याने लिहावी लागेल.

Monday, July 02, 2012

अचाट आणि अतर्क्यः इमान धरम

रंगीत टीव्ही भारतात आले आणि मला हिंदी सिनेमे पहायची सवय लागली. पुढे थेटरातल्या खुर्चीच्या हातावर तोल सावरून तीन तास बसता येऊ लागले('असं का?' म्हून इचाराल तर तेवा का नाई माजी उंची वाईच कमी हुती!) तेव्हा थेटरात जाऊन सिनेमे पहायची सवय लागली. पुढे उंची वाढल्यावर नीट खुर्चीत बसून सिनेमे पाहू लागले. मग मला (ऑनलाईन!) लिहिता येऊ लागले, तेव्हा या सिनेम्यांबद्दल लिहूही लागले. (जे जे आपणांसी ठावे..)

अचाट, अतर्क्य, लॉजिक गंडलेले, कथा गायब असलेले, विज्ञानादी गोष्टींना तोंडात बोटे घालायला लावणारे, विलक्षण प्रसंग आणि गाणी असलेले बॉलीवूड सिनेमे ही माझी आवडती गोष्ट! असल्या काही सिनेम्यांबद्दल आधी इतरत्र लिहिले आहे. वोईच परंपरा इधर कंटिन्यू करने की हय.. (मृत ब्लॉगाला जिवंत करायला यापेक्षा बरे बाकी काही सुचले नाही. 'ममी रिटर्न्स'मधली ममीला 'जिवंत करायची' प्रक्रिया डिटेलवार दाखवली गेली असती, तर ते मंत्र तरी कामी आले असते! तर ते असो.)

या मालिकेतला पहिला सिनेमा 'इमान धरम'.

हा चित्रपट अमिताबच्चन आणि शशीकपूर यांच्या बालपणापासून सुरू होत नाही. पहिल्याच सीनमध्ये ते थेट मोठेच्यामोठे आणि कामाला लागलेले दिसतात. खरंतर चित्रपटातली सगळी परिस्थिती 'निरुपा इन व्हाईट सारी'ला इतकी अनुकूल आहे की, तिची उणीव फार जाणवली. तर ते असो.

तर पहिलंच दृश्य कोर्टाच्या आवारातलं. मुस्लिम अमिताभ आणि हिंदू शशी हे दोघं तिथे खोट्या साक्षी देण्याचा उद्योग चालवत असतात. उद्योगातले एम्प्लॉयी हे दोघंच. दोघंही खाऊनपिऊन सुखी दिसतात तेव्हा उत्पन्न चांगलं असावं पण एवढ्या खटल्यांमध्ये हेच दोघं वारंवार साक्ष देताना दिसतायत, हे जज्ज वा विरुद्ध पार्टीचा वकील वा इतर कुणालाच खटकत नाही. तसंच, नमुना म्हणून दोघांची एक-एक साक्ष दाखवली गेली आहे, त्यात शशी साक्षीसाठी जाताना उगीचच एका माणसाच्या कुबड्या घेऊन जातो. त्या कुबड्यांमुळे बहुधा आपण ओळखू येणार नाही, अशी त्याची समजूत असावी. (बेमालूम वेषांतर..!) मग तो गीतेवर हात ठेवून खोटी शपथ घेऊन खोटी साक्ष देतो. तिकडे अमिताभपण कुराणावर हात ठेवून खोटी शपथ घेऊन खोटी साक्ष देतो. यांच्या खोट्या साक्षींमध्ये इतकी ताकद असते की, खटल्याचं पारडं तात्काळ यांच्या बाजूने फिरतं.

संध्याकाळी मग ते कामं आटपली की सहसा वस्तीत राहणार्‍या हंगलमास्तरांकडे वाईच टेकायला म्हणून येत असतात. हंगलमास्तरांना पुस्तक वाचायची आणि वाचनात मध्ये व्यत्यय आला की, हाताला लागेल ती चपटी वस्तू पुस्तकात खूण म्हणून घालायची सवय असते. मास्तरांची मुलगी श्यामली ही आंधळी असते. तिच्यासाठी ते दोघं साक्षीच्या खोट्या कमाईतून टेपरेकॉर्डर घेऊन येतात. आता आणलाच आहे तर वापरला जावा, ह्या हेतूपायी तिचं गाण्याच्या कार्यक्रमात सिलेक्शन होत नाही आणि हे दोघं तिला वस्तुस्थिती न सांगता, रिकाम्या ऑडिटोरियमात तिच्या गाण्यांचा कार्यक्रम करतात. तिथे टाळ्यांचा कडकडाट ऐकवायला तो टेप वापरतात. एवढ्या हौसेने आणलेल्या टेपचा सकृत्याला वापर झाला म्हणून आपल्यालाही बरं वाटतं.

श्यामलीला एक बॉयफ्रेंड असतो. संजीवकुमार. त्याचे वडील मोठे उद्योगपती+धनाढ्य+तस्कर+पैशाला चटावलेला माणूस+मुलाची काळजी वाटणारा बाप असतात. त्यांच्या गटात रणजीत असे नाव असलेला प्रेम चोप्रा(निरुपाबाईंप्रमाणेच रणजीतचीही उणीव भासू शकली असती, ती प्रेम चोप्राचे नाव रणजीत ठेवून अंशतः दूर केली आहे), म्हातार्‍या माणसाचा विग लावलेला पण चेहर्‍याने तरुण दिसणारा अमरीश पुरी, इत्यादी मंडळी असतात. वडील असे असल्याने मुलगा एकदम निरिच्छ आणि दुसरं टोक असतो. हंगलमास्तरांच्या मुलीशीच तो सूत जुळवतो यावरून त्याच्या सच्छीलतेची खात्री पटते. तसंच, त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो सगळे धर्म पाळत असतो. त्याच्या खोलीत एका ओळीत सगळे धर्मग्रंथ आणि क्रॉस वगैरे पवित्र गोष्टी ठेवलेल्या असतात.

इकडे बांधकामावर काम करणार्‍या तामीळ रेखाबाई मराठी श्रीराम लागूंना भाऊ आणि उत्तरभारतीय शशीकपूरला बॉयफ्रेंड मानतात. तिकडे ख्रिश्चन हेलन आपण खरा काय उद्योगधंदा करतो हे आपल्या निरागस मुलीला कळू नये आणि तिची वडिलांना भेटायची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मुस्लिम अमिताभला तिचा औटघटकेचा, खोटा खोटा नवरा होण्याची गळ घालते मग शिखांचा रिप्रेझेंटेटिव्ह असावा म्हणून संजीव कपूरचा माजी सैनिक असणारा दोस्त म्हणून उत्पल दत्त येतो.

तर असं सगळं सुरळीत चालू असताना, कुरळ्या केसांचा भयंकर विग लावून चमत्कारिक दिसणारा शेट्टी श्यामलीला पळवून नेऊन अतिप्रसंग करू पाहतो. तेव्हा इतर लोकांमुळे ती वाचते आणि झटापटीत त्याच्या पांढर्‍या कोटाचा खिसा ओरबाडून फाडून काढते. तो खिशाचा तुकडा कुणीतरी तिच्याच बॅगेत टाकतं आणि हंगलमास्तर तो तुकडा नेहमीप्रमाणे खूण म्हणून गीतेत घालून टाकतात.

इकडे कुठल्याकी कारणामुळे संजीवकुमारचे वडील बाकी ग्यांगला नकोसे होतात आणि त्यांना मारण्यासाठी ते शेट्टीलाच सुपारी देतात. शेट्टी त्यांना मारायला येताना तोच कोट घालून येतो (गरिबी फार वाईट! एवढ्या सुपार्‍या घेऊनही त्याच्याकडे एका नव्या कोटापुरतेही पैसे उरत नसतात. किंवा तो लकी कोट असेल..) पण त्याला त्याने लाल खिसा शिवून घेतलेला असतो. (त्याचा विग पाहून त्याला सौंदर्यदृष्टी नाही, हे आपल्याला आधीच कळलेलं असतं. त्यामुळे पांढर्‍या कोटाला लाल खिसा पाहून आपण चकित वा खिन्न होत नाही.) वडिलांना मरत असलेले पाहून संजीवकुमार धावत त्यांच्यापाशी येतो तेव्हा त्या लाल खिशाची प्रतिमा त्याच्या मनात पक्की बसते. ('जानी दुश्मन' इफेक्ट!) मग पोलिस येतात आणि जो कुणी प्रेतापाशी असेल आणि रक्तरंजित कपड्यांत असेल तोच खुनी, या तत्त्वानुसार संजीवकुमारला अटक करतात. बाकीची ग्यांग संजीवकुमारचा काटा निघावा आणि खटला आपल्या मनासारखा व्हावा म्हणून, अमिताभशशी याच शुभंकरांना (मॅस्कॉट!) खोटी साक्ष द्यायला बोलावते आणि हेही दोघे मस्तपैकी खोटी साक्ष देऊन येतात आणि घरी आल्यावर त्यांना हाच तो श्यामलीचा होणारा पती, हे शुभवर्तमान कळते. आता केलेल्या सगळ्या गोष्टी उलट करण्याची व खोटेपणाची वाट सोडून चांगली कामे करण्याची मोठीच जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते.

शशीकपूरला लहानपणापासून एका मुस्लिम चाचांनी मुलासारखं सांभाळलेलं असतं. ते डबेवाले असतात. अतिआजारपण, अतिश्रम आणि भूक अशा तीन गोष्टींमुळे त्यांचं पोचवायचा डबा हातात असतानाच प्राणोत्क्रमण होतं. ते जाताजाता त्यांचं एक कुराण शशीला सांभाळून ठेवायला सांगून जातात. शशी त्यांच्या घरून ते कुराण लाल कापडात लपेटून, छातीशी धरून नेत असताना पाऊस सुरू होतो. कुराण ज्यात बांधलेले असते त्या लाल कापडाच्या तुकड्याचा रंग जात असतो. शशी पाऊस लागू नये म्हणून ते स्वतःच्या पांढर्‍या शर्टाआड धरून घेऊन येत असताना कापडाचा रंग जाऊन खिशाच्या ठिकाणी लाल डाग पडतो. तोच घालून संजीवकुमारला भेटायला गेल्यावर 'ऐसा कुछ तो मैने पहले भी देखा हय..' असे त्याला जाणवते आणि तो शेट्टीच्या कोटाबद्दल या दोघांना माहिती देतो. तोवर इकडे श्यामली घरभर पसारा करून अमिताभच्या मदतीने गीतेतला मूळ पांढरा तुकडा बाहेर काढते. त्या तुकड्यावरून हे शेट्टीचा बार गाठतात. ('सुतावरून स्वर्ग'स्टाईल!) आणि शेट्टी पकडला जातो.

दरम्यानच्या काळात ग्यांग गप्प बसलेली नसते. ती या तिघांच्या सुपार्‍या देते. पण इकडे या दोघांकडे आता कुराण व गीतेच्या प्रती असतात. रात्री गुंड या दोघांना मारायला येतात. गुंडाने हळूच दरवाजा उघडल्यावर मोठा टेबलफ्यान लावला असावा, तशी अमिताभने झोपताना समोर ठेवलेल्या कुराणाची पाने फडफडू लागतात. गुंड दार बंद करतो पण बहुधा फॅन चालूच ठेवतो कारण पाने उडतच राहतात. साहजिकच अमिताभला जाग येते आणि तो फाईट देऊन वाचतो. तिकडे शशी गीता(पुस्तक!) छातीवर घेऊन झोपलेला असतो, त्यामुळे गुंडाने चाकू मारल्यावर तो गीतेच्या पार जात नाही (चाकू 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि'ला अडला असेल काय?) आणि शशीही वाचतो. संजीवकुमारला मारायला आलेल्या माणसाला तो येशूचे वचन सांगून त्याचे मन पालटवतो.

ग्यांगचा बदला घेण्याचे अमिताभ आणि रेखाकडे काहीतरी तगडे कारण हवे म्हणून ग्यांगने बनवलेल्या नकली औषधाच्या इंजेक्शनामुळे हेलन मरते आणि ग्यांग बिल्डिंग बांधताना कमी दर्जाची सामग्री वापरायला भाग पाडते तेव्हा बिल्डिंग कोसळून रेखाचा मुकादम असलेला भाऊ मरतो.

शेवटच्या मारामारीला सगळ्या धर्मांचे, प्रांतांचे लोक एकत्र जमतात आणि नेहमीप्रमाणे जबर हाणाहाणी होते. फायनली, प्रेम चोप्राच्या हातात बंदूक आणि पर्यायाने सगळी परिस्थिती आलेली असतानाही हेलनच्या मुलीने आई गेल्यावर श्यामलीच्या गळ्यात घातलेला क्रॉस उन्हात लखलखतो आणि त्याने प्रेम चोप्रा विचलित झाल्याने अमिताभशशी चपळाई करून त्याच्यावर मात करतात.

अशाप्रकारे, अमिताभशशीला धर्मग्रंथांचे खरे महत्त्व कळाल्याने शेवटी सिनेमा संपतो.