शुक्रवारी रात्री बाहेर जेवून आम्ही दोघे घरी आलो आणि फोन वाजला. पल्याड आजी!
"का गं? इतक्या उशिरा फोन? काय झालं?" मी जरा धसकूनच विचारलं. माझ्या रात्री उशिरा भारतातून फोन आला की, मला आधी भीतीच वाटते.
"काय व्हायचंय? काही नाही. आमच्याकडे दहाच वाजलेत अजून. अजून 'कैसे मै जिऊ तेरे बिन?' सुरू पण झाली नाही. पण आत्ता एक 'ब्रेकिंग न्यूज' आहे." आज्जीची ब्रेकिंग न्यूज म्हणजे टीव्हीवरल्या कुठल्यातरी मालिकेबद्दलच असणार. देवपूजेआधी 'सास, बहू और साजिश!' नेमाने बघणारी आहे माझी आज्जी!
"अगं, राधादेवी नावाच्या एका बाईंनी एकता कपूरवर केस केलीये. 'कसौटी नागिन की' ही मालिका त्यांच्याशी सल्लामसलत न करता, त्यांची परवानगीही न घेता तिने त्यांच्या कुटुंबावर तंतोतंत बेतली म्हणून!"
माझ्या हातातून फोन पडतापडता राहिला. आईच्या भिशीमंडळातल्या जोशीबाईंची मुलगी नोकरीच्या मुलाखतीला दागदागिने न घालता, जरदोसी साडी न नेसता चक्क फॉर्मल्स घालून गेली, हे कळलं तेव्हा अजबच वाटलं होतं. कोपरकरकाकू त्यांच्या नव्या सुनेबरोबर आनंदाने केसरीच्या 'माय फेअर लेडी'ला गेल्या, तेव्हाही ही गोष्ट मी धीराने घेतली होती. मेहतांच्या घरात पाच जावा गुण्यागोविंदाने पंधरा वर्षं नांदतायत, हे पाहून चक्करच आली, तरी चटकन सावरले होते. दागिने लॉकरमध्ये ठेवणार्या, खुशाल रात्री बेडरूममध्ये नाईटगाऊन घालून झोपणार्या बायका पहिल्यांदा पाहिल्या तेव्हा जगबुडी जवळ आल्याची भावना मनात तीव्रतेनं दाटून आली होती. पण आपल्या कुटुंबावर मालिका बेतली म्हणून एकता कपूरवर केस?
"अगं, पण केस का? आणि तिने डिस्क्लेमर दिलाच असेल नं... 'इस धारावाहिक के सभी पात्र, घटनाएं काल्पनिक है..' वगैरे? मग राधादेवींच्या केशीत काही दम नाही."
"नाही ना गं. याच मालिकेमध्ये नेमकी ती डिस्क्लेमर द्यायला विसरली. जिस दिन पती का अॅक्सिडेंट होना होता है, उस दिन ही सुहागन मांग मे सिंदूर भरना भूल जाती है... (साभार: 'सिंदूर तेरे नाम का ...आखिर किस काम का?')"
एकतेच्या मालिका कायम वास्तवदर्शी असतात, खर्या घटनांवर बेतलेल्या असतात, हे आपल्याला ठाऊक आहेच. आपल्या दैनंदिन जीवनातले छोटेमोठे बारकावे टिपून ते सुंदर पद्धतीने आपल्यासमोर मांडणार्या या प्रतिभावंत स्त्रीवर एका न दिलेल्या डिस्क्लेमराचं निमित्त होऊन केस व्हावी, ह्याचं नाही म्हटलं तरी मला वाईट वाटलं. 'कसौटी नागिन की'साठी तर तिने विशेष मेहनत घेतली होती. एका इच्छाधारी नागिणीच्या कुटुंबात घडणारी ही कहाणी! इच्छाधारी सासूच्या इच्छेविरुद्ध लग्न करून घरात (बिळात?) आलेल्या राधेचा हा अचंबित करणारा जीवनपट! अनेक कसोट्यांमधून पार होत, राधा आपल्या वासुकी, शेषा आणि तक्षक (सर्व इच्छाधारी!) या मुलांना कसे मोठे करते, जंगलात सापडलेल्या एका मानवी मुलीला आपलीच मुलगी समजून कसे वाढवते, घरातली सत्ता हळूहळू पण ठामपणे स्वतःच्या ताब्यात कशी घेते वगैरे गोष्टी तर अप्रतिम होत्या. खरेतर आपल्या कुटुंबाची जीवनकहाणी मालिकेचा विषय व्हावी, ही तर गौरवाची बाब! आणि गेल्यावर्षीच सुरू झाल्यापासून 'कसौटी नागिन की' सर्वोच्च टीआरपी घेऊन घराघरांतली आवडती मालिका झाली होती. मग आत्ताच राधादेवींचे काय बिनसले?
दुसर्या दिवशी मराठी पेपरांच्या साईट्स अधीरतेने उघडल्या. सगळ्यांच्याच पहिल्या पानावर घारे डोळे, कुरळे केस असलेल्या राधादेवींचे, केस दाखल करायला सर्वोच्च न्यायालयात जात असतानाचे फोटो आणि खाली कॅप्शन.. 'बिलनशी नागीण निघाली'! संतप्त राधादेवी चालत(!) सर्वोच्च न्यायालयाकडे निघाल्या होत्या. 'मी थेट सर्वोच्च न्यायालयातच केस दाखल करणार आहे, कारण तिथे हरल्यावर एकतेला निकालाविरूद्ध अपील करण्यासाठी कुठलेच न्यायालय मिळू नये.' त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर घोषणा केली.
नाथमाधवांच्या शैलीत सांगायचे तर राधादेवींना सर्वोच्च न्यायालयाच्या वाटेवर सोडून आपण 'कसौटी नागिन की'च्या म्हणजे पर्यायाने राधादेवींच्या 'घरात' डोकावून अधिक माहिती जाणून घेऊया.
इच्छाधार्यांच्या समाजातले बरेच जुने घराणे राधादेवींचे. घरातले १८५७ सालचे फर्निचर आणि आणि ते ज्या पणजीच्या कितव्यातरी वाढदिवसानिमित्त खरेदी केले होते ती (आजही हयात!) पणजी, या दोन गोष्टी घराण्याचे जुनेपण सिद्ध करायला पुरेशा होत्या. जमिनीखालचे धन सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या बर्याच पूर्वजांनी त्यामोबदल्यात मिळवलेली एकेक एकेक मोहर जमवत आजच्या घडीला संपत्ती आणि तिजोरीत मोहरांना जागा नाही उरली की, थोड्या मोहरा खर्चून घेतलेल्या इस्टेटी आणि हवेल्याही बर्याच झाल्या होत्या. खेरीज एकत्र कुटुंबपद्धत होतीच!
राधादेवींच्या केशीमागच्या नेमक्या कारणाचा अंदाज यावा म्हणून मी मालिकेचे भाग पहिल्यापासून आठवायला सुरुवात केली. पहिल्या भागात (हा भाग नागपंचमीला दाखवला गेला हे चाणाक्ष, इ. वाचकांना सांगायला नकोच!) तरुण राधेचे लग्न करून घरात येणे, या घटनेपासून कथानकाला सुरुवात झाली. राधेचं माहेर आणि सासर तोलामोलाचं, सगळेजण एकाच इच्छाधारी समाजातले तेव्हा राधेच्या वडिलांनी लग्नात जावयाला हुंड्यात खानदानी नागमणी देऊन टाकला. झालं! राधेच्या लग्नानंतर ज्यातून घरात संघर्ष निर्माण होईल, असा एक महत्त्वाचा मुद्दा नाहीसा झाल्याने राधेच्या सासूला जबर धक्का बसून ती कोमात गेली. इच्छाधारी हे अर्धे नाग असल्याने त्यांना चलनवलनाची गरज सामान्य मनुष्यांपेक्षा अधिक असते. घरात जितकी कारस्थाने होतील, जितकी भांडणे होतील, जितक्यावेळा रागारागाने नाग-मनुष्य असे रूप बदलावे लागेल, तितका व्यायाम होऊन इच्छाधारी चटपटीत राहतात. तेव्हा राधेच्या सासूबाई अशा सुरुवातीलाच कोमात जाणे म्हणजे एकंदरीत मालिकेला गालबोटच! परंतु, पुढे तर सगळे कसे आलबेल झाले होते. ज्यावरून घरात महायुद्ध पेटावे, असे किमान सहा नागमणी आतापावेतो मालिकेत आले होते, ज्यांना केवळ मुलीच झाल्या अशा किमान दोन सुना घरात होत्या, घरातल्या सगळ्या महत्त्वाच्या किल्ल्या ठेवलेली मखमली पेटी (हिच्यावर 'घरातली सत्ता' असे ठळक अक्षरांत लिहिले होते! जिच्याकडे पेटी ती सम्राज्ञी असा साधा हिशोब होता.) तर 'पासिंग द पार्सल'सारखी हिच्याकडून तिच्याकडे जात असे, कुठल्याही बर्या चाललेल्या गोष्टीत 'विष कालवणे' हा तर सगळ्यांच्या हातचा मळ! सगळे सुरळीत चालू होते. एकतेवर केस करता येईल, असा एकही प्रसंग मला आठवेना.
निरुपायाने मी आजीला फोन लावला. मात्र यावेळेस आजीचेही डोके चालेना!
"असा प्रसंग कधी आला नव्हता बघ. 'कुछ अपने, कुछ पराये' मालिकेत शेवटी मधल्या सुनेच्या आधीच्या नवर्यापासून झालेल्या मुलालाच नंतरचे सासरे आपल्या सगळ्या इस्टेटीचा वारसदार बनवणार, हे मी ती दुसरं लग्न करून आल्यावर वाड्याच्या मुख्य दरवाजात उभी राहून ओवाळून घेत होती, तेव्हाच ओळखलं होतं. पण ह्या राधादेवींचं काहीच कळेनासं झालंय बघ... कालपासून विचार करून डोकं फुटायची वेळ आलीय. आता परवा टीव्हीवर राधादेवींची मुलाखत आहे, तोवर हा सस्पेन्स असाच राहणार गं बाई..."
दोन दिवस मलाही नीटशी झोप आली नाही. ते चॅनल सुदैवाने सिंगापुरात उपलब्ध होते, मात्र इथल्या वेळेनुसार रात्री दीड वाजता मुलाखत प्रसारित होणार होती. मी रीतसर दुसर्या दिवशीची रजा टाकली. प्रोजेक्टाचा एक मोठा रिलीज दुसर्या दिवशी होता. आयटीत काय, काही फार करायला उरले नसले की रिलीज होतात. मालिकेत काही घडत नसले की, अख्खे कुटुंब हिंदी सिनेम्याच्या गाण्यांवर एपिसोडभर नाचत बसते तसे! तेव्हा रिलीजला फार महत्त्व द्यायचे कारण नव्हते. मॅनेजरणीला प्रसंगाचे गांभीर्य समजावून सांगितल्यावर तिनेही सुटी द्यायला खळखळ केली नाही. तिच्याही डोळ्यांत मला एकतेविषयीची काळजी स्पष्ट दिसत होती.
..... स्टुडिओत बसलेल्या प्रत्येक माणसाच्या चेहर्यावर प्रचंड ताण दिसत होता. सूत्रसंचालिकाबाई वारंवार मेकप टिपत होत्या. वातावरणनिर्मिती करायला 'मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा..' वगैरे श्रवणीय गाणी वाजत होती. परिस्थिती हाताबाहेर गेली तर सावरायला असावेत, म्हणून एका कोपर्यात काळे कपडे घातलेले तीनचार गारुडी पुंगी घेऊन तयारीत बसले होते. आणि राधादेवी अवतीर्ण झाल्या. त्यांनी घार्या डोळ्यांनी एकवार सूत्रसंचालिकेकडे आणि एकवार प्रेक्षकांकडे रोखून पाहिले. टाचणी पडली तरी आवाज होईल, इतकी शांतता एका क्षणात स्टुडिओत पसरली. 'एकतेचं काय चुकलं?' या महामुलाखतीला सुरुवात झाली.
****
"जवळपास एक वर्ष झालं मालिका सुरू होऊन. एकता कपूरने मालिकेची लोकप्रियता वाढवायला डिस्क्लेमर न देताच मालिका दाखवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मग आता नेमके काय झाले? केस करायचा निर्णय तुम्ही का घेतला?" सूत्रसंचालिकेने मुद्द्याच्या प्रश्नाला हात घातला. प्रेक्षकांची उत्कंठा ताणली गेली, श्वास रोखले गेले.
"त्याचं काय झालं, एकदा मी आणि माझ्या दोन्ही जावा... आम्ही पाच-तीन-दोन खेळत बसलो होतो. आम्ही तिघी बरेचदा पाच-तीन-दोन खेळतो. आणि रविवारी दुपारी सगळे घरी असतात तेव्हा पत्त्यांचे चार कॅट घेऊन बदाम सात. परंपराच आहे आमच्या घराण्यातली. तर ते असो. आम्ही खेळत होतो तेव्हा माझी मधली जाऊ, जी माझी थोरली बहीण आहे ती मला म्हणाली की, बरेच दिवस झाले, घरात इस्टेटीवरनं काही वाद झालेलेच नाहीयेत. अगदी कंटाळा आलाय. खेरीज वजनही वाढतंय.
मी खाडकन झोपेतून जागी झाल्यासारखी झाले. हे आपल्याला कसं जाणवलं नाही? तरीच गेले काही दिवस आपण आळसावल्यासारखे घरभर हिंडतो. वजन तर आपलेही वाढायला लागले आहे. आणि त्याच्या मुळाशी काय कारण असेल याचा शोध न घेता आपण चक्क मनुष्यांप्रमाणे जिमला जायला लागलो.... इच्छाधार्यांच्या कुळात जन्मून कुळाला कलंक लावणारे वर्तन आपल्याला शोभत नाही. बस्स! आम्ही तिघी तडक उठलो आणि आमच्या चिरंजीवीमातांकडे गेलो."
"चिरंजीवीमाता म्हणजे त्याच ना? कुणीच नव्हते तेव्हा त्या होत्या, आज सगळ्यांबरोबर त्याही आहेत आणि उद्या आजचे सगळे नसतील तरी त्या असतील?"
"होय त्याच. त्यांनी बराच काळ जग आणि आमच्या घराण्याचा सर्व कारभार बघितल्यामुळे कुठली इस्टेट वादाला चांगली, कुणाकडच्या दागिन्यांवरून भांडण पेटू शकते, इत्यादी गोष्टींची त्यांना खडान्खडा माहिती असते. तर बराच वेळ आम्ही त्यांच्याशी सल्लामसलत केली. तेव्हा कळले की, आमच्या घराच्या इशान्येला चार कोसांवर असलेली हवेली, त्याच्या आसपासची दहा एकर जमीन आणि हवेलीच्या उत्तर बाजूला पुरलेले गुप्तधन या गोष्टी वादाला बेस्ट. ताबडतोब आम्ही तिघींनी आपापल्या मुलांच्या वतीने त्यावर हक्क सांगितला आणि वादाला आरंभ झाला."
"हो.. हा भाग पाहिलाय मी. एका तासाचा महाएपिसोड होता ना? हवेली कित्ती छान दाखवलीये नै एकतेनं? सेट आहे असं वाट्टतच नै.." सूत्रसंचालिकेला डोळ्यांच्या जरबेनंच गप्प करत राधादेवी पुढे सांगू लागल्या.
"तर वादाचा प्रारंभ झाला. एकदम अंगात कशी तरतरी आली. दहा वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटलं. मी तर लगोलग रूप बदलून इव्हनिंग वॉक(?)ही घेऊन आले. संध्याकाळी हे आले तेव्हा त्यांच्या कानावरही ही चांगली बातमी मी घातली. त्यांनाही बरं वाटलं. दुसर्या दिवशी होळीपौर्णिमा होती. मधल्या जावेनं प्रत्यक्ष कृतीला सुरुवात म्हणून मी तिला वाढदिवसाला दिलेली महागाची जरदोसी साडी होळीत टाकली. त्या तिच्या कृतीने यावेळच्या भांडणाचं गांभीर्य एकदम सगळ्यांच्या लक्षात आलं."
राधादेवी कथा सांगण्यात आता चांगल्याच रंगल्या होत्या. हे भाग आधी कैकवेळा पाहिलेले प्रेक्षक आता पुनर्प्रत्ययाचा आनंद घेत होते. ज्यांचे हे भाग पाहायचे राहिले होते, ते मूठभर लोक भक्तिभावाने हा दुर्मिळ योग अनुभवत होते. सूत्रसंचालिकेला मात्र गप्प बसवेना.
"जरदोसी साडी होळीत टाकली म्हणून काय झालं एवढं?"
तिच्या प्रश्नाने राधादेवींच्या चेहर्यावर आलेले हताश भाव स्पष्ट दिसले. 'बहुधा ही बाई मालिका कधीही नीट बघत नसावी. मालिकांचं जाऊ दे, हिला साध्या रोजच्या जगण्यातल्या चालीरीतीही नीट माहीत नाहीत. अशाने उद्या हिची नोकरी जाईल, हे हिला कळत नाही का?' वगैरे मनात आलेले विचार कष्टाने बाजूला सारून त्या उत्तरल्या.
"जरदोसी साडी ही सगळ्या नामवंत घराण्यातल्या बायकांसाठी मानबिंदू असते. मुलीचं लग्न ठरलं की, तिला जरदोसी साडी नेसूनच सर्वत्र वावरायला शिकवले जाते. ऑफिस, पिकनिक, झोप, जेवण या सर्व प्रसंगी जरदोसी साडीच नेसून राहावे लागते. आजकालच्या उठवळ मुली जीन्सबीन्स घालतात पण नामवंत घराण्यांतल्या मुली अशी मर्यादा कधी ओलांडत नाहीत. तर अशी ही मी दिलेली मानाची साडी जावेने आगीत टाकली म्हणजे सरळसरळ अपमान नाही का झाला माझा?"
"ते असो. एकदाची भांडायला सुरूवात झाली तसतसे तपशीलवार कट आखले जाऊ लागले. त्या हवेलीची कागदपत्रे शोधायला घरातले लोक रूप बदलून प्रत्येक सांद्रीसापटी तपासून पाहू लागले, एकमेकांना जायबंदी करायच्या सुपार्या देण्यासाठी म्हणून प्रत्येकानेच आपापली पिग्गीबँक फोडून लाखालाखांची बंडले बनवून ठेवली. कुठल्याही दोन व्यक्ती महत्त्वाचे काहीही बोलायचे असेल तेव्हा दारेखिडक्या उघड्या ठेवण्याची दक्षता घेऊ लागल्या. माझा धाकटा मुलगा आणि धाकट्या जावेचा थोरला मुलगा हे जायबंदी होऊन सगळ्यांत आधी आयसीयूमध्ये पोचलेदेखील! असा सगळ्या घडामोडींना रंग भरत असता पद्मावती घरी आली."
"ही पद्मावती कोण?" सूत्रसंचालिकेच्या या भयंकर वाक्यानंतर राधादेवींनी संतापाने टाकलेला फूत्कार प्रेक्षकांच्या काळजाचे पाणीपाणी करून गेला. 'अगं ए, पद्मावती म्हणजे राधादेवींची सवत.' प्रेक्षकांतला एकजण न राहवून ओरडला. बर्याच वर्षांपूर्वी राधादेवींच्या नवर्याची स्मृती जाऊन तो मनुष्यरुपात जंगलात भटकत असता पद्मावतीने त्याला मनोमन आपला पती मानून स्वतःच्या घरी ठेवून घेतले होते. राधादेवींनी केलेल्या रक्षकतक्षकव्रताच्या (तक्षक हाच आपला रक्षक मानून सलग तीन नागपंचम्यांना त्याची यथासांग पूजा करणे व आपल्या एका मुलाचे नाव 'तक्षक' ठेवणे!) पुण्याईने तो घरी परत आला खरा, पण पद्मावतीच्या समर्पित वृत्तीने त्याचे मन जिंकले होते. त्यामुळे त्याने तिचा त्याग न करता लांबवर एक हवेली बांधवून तिला तिथे राहायला सांगितले. पुढे तिला 'कालिया' नावाचा मुलगा झाला. (होणारच!)
"पद्मावतीने घरी येऊन बॉम्बच टाकला. तिचे म्हणणे होते की, माझ्याप्रमाणेच तीही घरातल्या सगळ्यांत मोठ्या भावाची बायको असल्याने कालियादेखील वासुकीप्रमाणेच त्या हवेलीवर हक्क सांगू शकतो. खरेतर आता कालियाचे लग्नाचे वय झाले आहे, त्यामुळे कुणाच्याही मुलीला मागणी घालायला जाताना त्याच्याकडे सांगता येण्याजोगी इस्टेट हवी. एवढे बोलून पद्मावती थेट चिरंजीवीमातांचे पाय अहोरात्र चेपायच्या कामावर रुजू झाली. चिरंजीवीमातांना रात्री गाढ झोप लागली की, ती रूप बदलून हवेलीच्या कागदपत्रांचा शोध घेत असे. जिला पहिल्यांदा कागदपत्रे सापडतील ती ती कागदपत्रे स्वतःला हवी तशी बदलून घेणार, हे गृहीतच होते. मग इतरांना काहीही करता आले नसते.
पद्मावतीच्या येण्याने आता सारा मामला मी विरुद्ध पद्मावती असा झाला होता. सुदैवाने बाकीच्या दोघी वरकरणी तरी मला साथ देत होत्या. 'तू विरुद्ध ती असा सामना असेल तर इस्टेट त्या घरात जाण्यापेक्षा या घरात राहिलेली बरी गं बाई!' असं त्यांचं मत होतं. त्यानुसार आम्ही कट शिजवत असताना एक अघटित घडलं. मानवी कालियाच्या प्रेमात पडली."
"मानवी? म्हणजे तुमची मानलेली मुलगी ना? पण मानवी का?"
"हो. मालिकेत मानव नावाचे सद्गुणी नायक असतात तशीच माझी सद्गुणी 'मानवी' आहे. खेरीज आम्हां सर्व इच्छाधार्यांमध्ये ती एकटी पूर्णपणे मनुष्ययोनीतली त्यामुळे ते नाव तिला योग्यच आहे. असो. तर ती नेमकी त्या वाया गेलेल्या कालियाच्या प्रेमात पडली. बाई गं! कसा तो खडतर काळ! खरं पाहता तो केवळ ती माझी लाडकी असल्याने मला नामोहरम करण्यासाठी तिला माझ्याविरुद्ध फितवू पाहत होता. पण पुढे काय झालं ते तुम्हांला माहीत आहेच. त्या दोघांमध्ये अचानक गैरसमज निर्माण झाले आणि ते वाढतच गेले... आम्हांला तिचं दु:ख मग सहन होईना म्हणून आम्ही एका तोलामोलाच्या मनुष्य घराण्यात तिचं लग्न करून दिलं. आता कशी सुखात आहे ती!" हे सांगताना राधादेवींच्या चेहर्यावर गूढ हसू होतं.
"गैरसमज असे अचानक कसे निर्माण..." यावेळी राधादेवींनी इतकं रोखून पाहिलं सूत्रसंचालिकेकडे! तिचं वाक्य त्यामुळे अर्ध्यातच तुटलं.
"हं तर.. गोष्टी अशा चालू होत्या आणि चालूच होत्या. इस्टेटीचा हा वाद चांगलाच वाढत चालला होता आणि संबंधित कागदपत्रं काही केल्या सापडतच नव्हती. तेवढ्यात या सगळ्या कटकारस्थानांचा कळस झाला. घरातले प्रामाणिक, मजबूत आणि टिकाऊ असे रामूकाका, ज्यांचं आतडं कायम घरातल्या बाळगोपाळांसाठी तुटायचं... त्यांना आतड्याचा कॅन्सर झाला. जो माणूस एकावेळी दहा-दहा भाकर्या पचवायचा त्या मजबूत आतड्याच्या माणसाला आपोआप आतड्याचा कॅन्सर? असं कसं शक्य आहे? यात नक्कीच कुणाचातरी हात होता. इस्टेटीच्या वादाने आता गंभीर रूप धारण केलं होतं... आता एकच शेवटचा मार्ग होता..."
आतापावेतो कानांत प्राण आणून ऐकणार्या प्रेक्षकांनी एकमुखाने 'जातपंचायत' अशी गर्जना केली आणि सूत्रसंचालिकेने 'कुठला मार्ग?' हा प्रश्न तसाच गिळून टाकला. वाचली म्हणायची! राधादेवींनी अभिमानयुक्त नजर प्रेक्षकांवरून फिरवली. प्रत्येकाला कसं कृतकृत्य वाटलं.
"बरोबर! तर जातपंचायत करायची ठरली. दिवस मुक्रर झाला. आणि इथेच मालिकेमुळे घात झाला..." ती वेळ अखेर आली. काही क्षणांतच अख्ख्या देशाला काय झालं ते कळणार होतं.
"मालिकेत आमच्या घरात घडतं ते सर्वच्या सर्व दाखवत नाहीत त्यामुळे कधीकधी मालिका पुढे जाते. तशी ती नेमकी या महत्त्वाच्या वेळेलाच जाणार होती. आणि एकतेनं जातपंचायतीत काय घडलं, ते दाखवण्यासाठी माझ्याशी सल्लामसलत न करता स्वत:चं डोकं चालवलं...
इस्टेटीचा वारसदार कोण हे सहसा वयोज्येष्ठतेवरून ठरतं आमच्या समाजात. त्यामुळे ज्याला ज्याला इस्टेटीत रस होता त्याने वय कन्फर्म करायला आपला शाळा सोडल्याचा दाखला घेऊन यायचा असं पंचांनी सांगितलं. मधली आणि धाकटी.. दोघींची मुलं आपसूकच बाद झाली. शेवटी उरले वासुकी आणि कालिया... आणि सर्वांना कळलं.. कालिया वासुकीपेक्षा दोन महिन्यांनी मोठा आहे... हे रहस्य केवळ मला माहीत होतं कारण कालियाच्या जन्मावेळेला माझ्या विश्वासू मोलकरणीच्या हाती मी त्याच्यासाठी बाळंतविडा पाठवला होता. हे रहस्य मी कधीही उघडकीला येऊ देणार नव्हते. पण एकतेनं... खेरीज तिने डिस्क्लेमर न देण्याची टूम यावेळी काढली. तो नसल्याने दाखवलेली गोष्ट खरी आहे, काल्पनिक नाही याबद्दल कुणाच्याच मनात शंका उरली नाही."
अनेक प्रेक्षक धक्का सहन न झाल्याने बेशुद्ध पडले. कित्येक बायकांनी तर स्वतःचे कान घट्ट झाकून कर्णकटू किंकाळ्या फोडल्या. स्टुडिओत एकच हाहा:कार झाला. राधादेवी डोक्याला हात लावून बसल्या होत्या. सूत्रसंचालिकाही सुन्न झाली होती.
"आता पद्मावती आपला मुलगा सगळ्यांत मोठा असल्याचा फायदा घेत आमच्या हवेलीतच कायमचं राहायला यायचं म्हणतेय. ती इस्टेट तर गेलीच कालियाकडे पण आता वासुकीला ज्येष्ठ बंधू म्हणून मिळणारा मान, भावी संपत्ती, इस्टेटी, येणारी तोलामोलाची स्थळं सग्गळं सग्गळं कालियाला मिळणार. एवढंच काय, आता पद्मावती म्हणतेय की, आता माझं स्थान तिला मिळायला हवं. 'घरातली सत्ता' या पेटीसकट.... आता सांगा, इतकं सगळं नुकसान झाल्यावर केस नाही करायची एकतेवर? मग काय करायचं?"
स्टुडिओत जीवघेणी शांतता पसरली. मीही थक्क होऊन टीव्हीच्या पडद्याकडेच पाहत होते. तेवढ्यात फोन वाजला. आजीच!
"आजी, आता गं?" मी कसंबसं एक वाक्य उच्चारलं.
पण 'कुछ अपने, कुछ पराये'मधला संपत्तीचा वारसदार एका फटक्यात ओळखणार्या माझ्या आज्जीकडेही आता काही उत्तर उरलेलं नव्हतं.
(हा लेख 'माहेर' मासिकाच्या मार्च-२०११च्या अंकात पहिल्यांदा प्रकाशित झाला होता.)