Tuesday, April 23, 2013

हायकू हायकू हाय हाय...


माझ्या आधीच्या गझलपोस्टात (अख्ख्या उत्तर सिंगापुरात गाजलेल्या, इ.[१]) मी माझ्या दुसर्‍या एका तितक्याच ताकदीच्या कवितेची अल्पशी झलक दाखवली होती. 'ही पूर्ण कविता मी लौकरच प्रकाशित करेन' असा वादासुद्धा केला होता. तो वादा मी आज निभावत आहे.[२] गेल्यावेळेस मी 'गझल' हा परदेशीय प्रकार हाताळला होता, तीच परंपरा पुढे चालू ठेवत या कवितेत 'हायकू' हा दुसरा परदेशीय प्रकार हाताळला आहे.

तर आता आपण हायकूची कृती पाहू. पदार्थ सोपा, लहानसा दिसत असला तरी कृती कॉम्प्लेक्स आहे. 'हायकू' प्रकार साधारणपणे तीन ओळी व्यापतो. बेसिक हायकू बनवायला साधारणतः दोन-तीन शब्दांनंतर एकदा एंटर दाबावे. दुसर्‍यांदा एंटर दाबल्यानंतरची ओळ ही शेवटची ओळ असावी, हे अवधान राखावे. चौथी ओळ आल्यास 'हायकू' बिघडेल आणि त्याची चारोळी बनेल. या चारोळ्या हायकूंसारख्या रुचकर आणि ग्लॅमरस नसतात, हे सदैव लक्षात ठेवावे. हायकू हे नजाकतीने रचायचे नाजूक प्रकरण आहे. हायकू या शब्दातदेखील एखादे जरी अक्षर वाढले तरी होणारा परिणाम भीषण असतो. (अधिक माहितीसाठी: 'हायहुकू..'हे सुनील शेट्टीचे गाणे पहा.[वैधानिक इशारा: गाणे आपापल्या जबाबदारीवर पाहणे. गाणे पाहून काही दुष्परिणाम झाल्यास सदर लेखिका जबाबदार नाही.]) गझलेप्रमाणे यातही विविध विषय हाताळता येतात. तर आता आस्वाद घेऊया खालील हायकूंचा. येथे चौथी ओळ दिसते ती मूळ हायकूचा भाग नाही, त्यात नेहमीप्रमाणे वाचकांस सोयीस्कर म्हणून विषय दिलेला आहे.

आला आला पाऊस.
पाउसात भिजायची,
मला भारी हाऊस!
- तरुणाईचा हायकू

आला आला पाऊस.
रेनकोट घेतल्याविना,
पाउसात नको जाऊस!
- काळजीवाहू हायकू

आला आला पाऊस.
कॉम्प्युटरावर आले थेंब,
अन भिजला माझा माऊस!
- यंत्रयुगीन टेक्नो हायकू

आला आला पाऊस.
तेवढ्यासाठी कळकट ठिकाणी,
कांदाभजी नको खाऊस.
- आरोग्यपूर्ण हायकू

आला आला पाऊस.
बागेला पाणी घालायला,
आज पाईप नको लाऊस.
- निसर्ग, पाणीबचत आणि काम वाचल्याचा आनंद एकत्रित असणारा हायकू

आला आला पाऊस.
आता कर पुरे,
मेघमल्हार नको गाऊस.
- तानसेनाच्या बायकोचा मुघलकालीन हायकू.

[१]: 'आधीची गझल अख्ख्या उत्तर सिंगापुरात गाजली आहे याला पुरावा काय?' असे काही संशयात्मे विचारतीलच. गझल प्रकाशित केल्यावर मी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पळणार्‍या चिनी लोकांना('पळणार्‍या' म्हणजे रात्री जॉगिंग करतात ते! नाहीतर माझी गझल ऐकायला नको म्हणून पळत असतील, असे इथे काहीजण म्हणतील.) थांबवून थांबवून सर्व्हे केला. गझल रोमन लिपीत लिहून तीनेकशे कागद छापून नेले होते. 'गझल कशी वाटली?'ला समोरून '९-१०', 'एमारटी स्टेशन समोर आहे', 'तीनशेचोपन्न नंबरचा ब्लॉक इथून डावीकडे गेल्यावर आहे', 'रस्ता ओलांडण्याआधी सिग्नलचे बटन दाबा' अशी उत्तरे आली. कधीकधी संवादात अडचण येऊ शकते. पण दिलेला गझलेचा कागद प्रत्येकाने जपून घरी नेला, हे मात्र मी पाहिले आहे. गझलेच्या लोकप्रियतेला एवढा पुरावा पुरेसा आहे. (पाठकोरा कागद वाया जाऊ नये म्हणून छापणार्‍याने त्या कागदाच्या मागे 'उद्यापासून सुरू होणार्‍या नव्या जीएचमार्ट सुपरस्टोअरमध्ये हे कूपन दाखवल्यास ७० टक्के सूट!' असे लिहिले होते. असे कुठलेही सुपरस्टोअर सुरू झालेले नाही, त्यामुळे लोकांनी कागद निव्वळ गझल संग्रही असावी म्हणूनच नेले यात काय शंका?)

[२]: कालच 'तू वाडा ना तोड..' हा जुना वाडा पाडणार्‍या बिल्डरशी लढा देण्याच्या पार्श्वभूमीवर बेतलेली प्रेमकहाणी असलेला भावपूर्ण सिनेमा पाहिल्यापासून मूळ गाणे सारखे मनात वाजत राहिले आहे. त्यामुळेच आज वेळ न दवडता मी वादा निभावला आहे.