Monday, October 10, 2011

गावाकडला ह्यालोवीन!

म्या परवा अन्नासंगट शेतात काम करीत हुतो तेवा अन्ना म्हनाला, गड्या आपल्याला जगाचं भान पायजे. जगात काय काय घडतंय त्ये आपल्याला म्हाईत पायजे. हातातली भाकर बाजूला ठिवून म्या लग्गीच गूगलवर ग्येलो. आमच्या मळ्यातल्या खोपटात ल्यापटॉप ठिवल्याला हाये. पैलीमंदी लोकमान्य टीळकांवर भाषन केलं तेवा माजा पैला नंबर आल्याला तेवा त्यो बक्षीस म्हूण मिळाला हुता. मंग दुसर्‍या वर्शी पाटलाच्या राम्याला पारश्यालीटी करून पैला नंबर आनि फेरारी गाडी दिली, तेचा मला लै राग आला न् मी शाळाच सोडली. त्ये असूंदे. तर म्या गूगलवर ग्येलो. तर थितं ह्यालोवीन सनाची म्हाईती कळली. अण्णा सनाबद्दल वाचून खुस जाला. आमी डिट्टेलवार म्हाईती वाचत हुतो तवर अन्नाची गर्ल्फ्रेंड संगीता थितं आली. तिनंबी म्हाईती वाचून घ्येतली. अन्नाकडं पाऊन म्हनती, तुले तं काश्चूमची गरजबी न्हाई आन ख्याख्या करून हासली. अन्ना शांत राईला. सद्या अन्ना बर्‍याच येळेला राग कंट्रोलमंदी करतो कारन का फुडल्या वर्शी तो युवकपार्टीकडनं सरपंचपदाच्या निवडनुकीसाठी हुबा र्‍हानार हाये. "संगे, गप! अन्नावर काँमेट करन्यापरीस आपुन सन कसा करायचा, काय करायचा त्ये ठरवू." म्या समजुतीनं बोल्लो. मंग आमी तीन मस्तंपैकी मोठ्ठे लाल भोपळे मळ्यातनं तोडून खोपटात आन्ले. मंग अन्नाने भोपळा कोरला तर त्यो संगीच्या बापासारखा दिसाय लागला. त्ये पाऊन संगी रागाऊन, पाय आपटत घरी निगून गेली. अन्नाबी बेरकी हाये. संगीच्या मगासच्या हासन्याचा मोका मिळताच लगीच बदला घ्येतला. राजकार्नात त्यो या गुनामुळेच एशस्वी हुईल, असं श्री. दादासाएब (श्रीपतरावसाहेब) कटकरे-इनामदार त्येला म्हनलेले त्ये खरंच हाय. अन्ना म्हनला, "गड्या, सनाच्या आदी आपुन तालुक्याच्या गावाला जाऊन क्यांडी आनूत. आनि येक म्हनजे हा सन आपुन माराष्ट्रात करत आहो तर कायतरी सांस्क्रूतिक कारेक्रमबी व्हायला पायजे." मंग आमी पुस्तकवाचनाचा कारेक्रम ठरीवला. तेच्यासाठी आमी 'झोंबी' ही आनंद यादवांची कादंब्री निवडली. झोंबी हे इंटरन्याशनल टायपाचा हॉरर प्रानी आहे. "एवड्या वर्शांपूर्वी इंटरन्याशनल हॉरर प्रान्यावर कांदबरी लिवणारे आणंद यादव हे खरे ग्लोबल लेखक होत." असं अन्ना म्हनाला. मग प्रमूख अतीथि म्हनून दादासाएबांचे धाकले साळे श्री. योगेशरावसाएब मानकामे-उंब्रजकर हेंना बोलवायचे ठरीवले. ते यूवकपारटीचे अर्ध्वर्यू हायेत. तेंना भेट म्हणून ड्र्याकूला पांघरतो ती शाल आन क्यांडी श्रीफळ (वेष्टर्नर लोक क्यांडी अ‍ॅप्प्प्प्पल देत्यात. आपल्या संस्क्रूतीत नारळ आहे, पण अ‍ॅप्प्प्प्पलसारके पापाला प्रव्रूत्त कर्नारे फळ न्हाई. आता अ‍ॅप्प्प्प्पल पापाला कसे प्रव्रूत्त करते, हा जर सवाल तुमाला पडला आसेल तर काय राव, तुमाला अ‍ॅडम-इव-सापाची ष्टोरी म्हाईत नाई का काय?) देन्याचेबी ठरीवले. ह्ये सम्दं आज यूवकपार्टीच्या मीटिंगीत अन्ना मांडनार हाए. इंटरन्याशनल अपील असलेल्या अशा सनांमूळे अन्नाची लोकेप्रियता वाडनार हेच्यात शंकाच न्हाई. नंतर म्यूनिशिपालिटीने आमच्या गावापरेंत रस्ता डांबरी केला की अन्नाचा थिते एफ१ रेशींग घ्यायचा प्लान आहे. अशाच रीतीने अन्ना एशस्वीतेच्या पाएर्‍या चढत जायील, हेविशयी शंका न्हाई. जय हिंद! जय माराष्ट्र! जय कटाची वाडी(खुर्द)!