आर्य उत्तरेकडून निघाले. उत्तरेकडून म्हणजे उत्तरा नावाच्या बाईकडून नोहे; उत्तर दिशेकडून. उत्तर ध्रुवावर तेव्हा सहा महिन्यांची रात्र झाली होती. त्यामुळे 'एकच (ध्रुव)तारा समोर आणि पायतळी अंधार' अशी आर्यांची स्थिती झाली होती. त्यामुळे ते चालत चालत निघाले. त्याकाळी विमाने, आगबोटी नव्हत्या. पण सुदैवाने खंड अखंड होते (हिते कायतरी ग्रॅमॅटिकल मिष्टिक हाय, पण ते सोडा.) त्यामुळे उ. ध्रुवावरून चालत चालत दक्षिण ध्रुवापर्यंत जाऊन पेंग्विन पाहून परतता येई. खेरीज 'सबै भूमी गोपाल की' असे कुणीतरी सांगून गेले होते आणि हा गोपाल बीजगणितातल्या 'क्ष'सारखा असल्याने कुणालाच कधी दिसला नव्हता. त्यामुळे देश, पास्पोर्ट, व्हिसा, वगैरे भानगडीही नव्हत्या.(असत्या, तर बिचार्या आर्यांची पंचाईत झाली असती, कारण उ. ध्रुवावर रात्र झाली की इमिग्रेशन ऑफिस सहा महिन्यांसाठी बंद होई.)
(गोपालसंदर्भात जास्तीचे संशोधनः अनेक वर्षे गेली तरी भूमी क्लेम करायला गोपाल काही येत नाही पाहून स्थानिक लोकांनी जमीन वाटून घेतली व अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सोविएत युनियन, दुल्हन के माथे की बिंदिया आय लव्ह माय इंडिया, इ. देश व देशभक्तीपर सिनेमे निर्माण केले.)
इकडे आर्य चालतच होते. शिकार करून जेवत होते. सततच्या चालीला कंटाळले होते. मग त्यांना हिमालयाचा पट्टा लागला. अजून हिमालयाला घड्या पडल्या नव्हत्या, त्यामुळे तो फ्लॅट होता.* आर्यांनी तो सहज ओलांडला व ते दिल्लीत येऊन पोचले. पराठेवाल्या गल्लीतून येणार्या वासांनी त्यांची भूक खवळली आणि 'यल्गार हो! हर हर महादेव! जय एकलिंगजी की! टूट पडो!' अशा घोषणा देत ते जेवणावर तुटून पडले. तेव्हा लग्नांचा सीझन चालू होता. त्यामुळे दिल्लीत रोज जेवणावळी असत. आर्य दिल्लीत नवे असल्याने त्यांना प्रायव्हेट फंक्शन्स, पब्लिक रेस्टॉरंट्स, वगैरे काही कळत नसे. जेवणाचा वास आला की, ते तिथे घुसून फडशा पाडीत. यालाच पुढे आर्यन इन्व्हेजन म्हटले जाऊ लागले.
काही काळाने आर्यन कबिल्याचा सरदार म्हटला, 'ड्यूड्स एन बेब्स, पॅक योर बॅग्स.. इट्स टाईम टू गो बॅक..' तसे सगळे आल्या वाटेने निघाले. पाहतात तो काय, तोवर हिमालयाला घड्या पडल्या होत्या नि तो अगदी 'परबत वो सबसे उंचा, हमसाया आसमाँ का' झाला होता.* कायम फ्लॅट भूभागावर राहिल्यामुळे आर्यांमध्ये १००पैकी १०१ जणांना व्हर्टिगो! त्यामुळे ते बिचारे परत जाऊच शकले नाहीत. अशी आहे आर्यन इन्व्हेजन थेरी!$
* - इथे मी पाच गोगलगाई व सतरंजी वापरून प्रयोग केला. आधी सतरंजी फ्लॅट असताना गोगलगाई आरामात इकडून तिकडे गेल्या. मग सतरंजीला घड्या घातल्यावर मात्र तिकडून इकडे येऊ शकल्या नाहीत. मात्र या प्रयोगामुळे थेरीला 'नॉट टेस्टेड ऑन अॅनिमल्स' हा शिक्का मिळाला नाही.
$ - आतापावेतो अशीच आहे. उद्या सारुकखानाचा मुलगा सिनिम्यात आला की पुन्हा नव्याने लिहावी लागेल.
3 comments:
OMG!
Note with astris is too much!!
I am trying to understand what would you call this type of writing. :) I havent this format before. But i am liking what i read. :D So keep writing.
-Vidya.
I am trying to understand what would you call this type of writing. :) I havent this format before. But i am liking what i read. :D So keep writing.
-Vidya.
Post a Comment