आमचे जावई श्री. सुखमल मोटवानी इंजीनियरिंग कॉलेज या प्रसिद्ध कॉलेजातून बीई झाले व त्यांनी वरणगाव येथे कूलसॉफ्ट ही सॉफ्टवेअर कंपनी जॉइन केली. तिथे त्यांना फास्ट कोडिंग आणि डोळे बंद करून कोडिंग या स्किलसाठी सलग दोन वर्षं बक्षीस मिळाले. त्यांची बदली आळंदी(देवाची) येथे झाली असताना आमची बबडी त्यांना भेटली. आळंदीसारख्या शुभ स्थळी असल्याने त्यांनी घरच्यांची परवानगी घेण्यात वेळ न घालवता ताबडतोब लग्न केले. त्यावरून आमचे हे खूप नाराज झाले होते. त्याच काळात तळपायाला भेगा पडण्याचा आजार झाल्याने मी बिछान्यावर पडून होते. या कठीण काळात जावयांनीच आमची फोनवरून सतत विचारपूस केली व माझ्यासाठी खास अॅक्युप्रेशर चपला व यांच्यासाठी इंपोर्टेड ब्लडप्रेशर गोळ्या त्यांनी आवर्जून भेट म्हणून पाठवल्या. बबडीच्या पायगुणाने त्यांचे प्रमोशन होऊन ते हवाईला आले. त्यांनी तिथून आवर्जून यांना पाठवलेल्या 'आय लव्ह हवाई' टीशर्टामुळे सासरा-जावई दुरावा खूपच कमी झाला व आम्ही हवाई ट्रिपसाठी आलो.
आम्ही खास हवाईत आलो म्हणून चिनी रेस्टॉरंटात गेलो. तिथे आम्हांला काही ते चिनी लिपीतले नाव वाचता आले नाही. पण जावयांनी घडाघड वाचले आणि ऑर्डर घ्यायला आलेल्या वेटरला विचारले - "parlez-vous francais?"
तेव्हाच वेटरला आकडी आली. (तो दुष्ट म्यानेजर म्हणे, तुमच्या जावयांच्या भयंकर प्रश्नामुळेच आली. कुजका मेला!) तर जावयांनीच त्याला प्रथमोपचार केला. त्यावर त्याने आम्हांला नूडल खायच्या बांबूच्या काड्या फुकट दिल्या. ही अजून एक अमूल्य भेट आम्हांला जावयांमुळेच मिळाली. (माझ्या लेकीची पुढच्या महिन्यात डिलिव्हरी आहे.) त्याआतच नायगारा उरकून घ्यायला आम्ही जाणार आहोत, जावयांनी त्यांच्या एअरलाईनमधल्या मित्राच्या ओळखीने बिझनेस क्लास तिकीटं काढली आहेत. ते खूपच काळजी घेतात आमची!(मित्र नव्हे, जावई!) आमच्या ह्यांना जरी बबडीने लव्हम्यारेज केलेले आधी आवडले नव्हते, तरी आता मात्र हे पूर्ण निवळले आहेत.
असे हे हवाई आणि असे आमचे जावई!
3 comments:
Jabardast, kharach aslech kaste te pailtir madhe.....
अतीशय सुंदर लेख. ती क्रेडीट्कार्डाची माळ घालण्याची कल्पना तर अफलातून आहे- खूप खूप आवडली. आता भारता मधे कोणाकडे इतके कार्ड्स असणार आहेत हो? सगळे आपले मध्यमवर्गीय लोकं, फार तर एक क्रेडीट कार्ड आणि एक डेबिट कार्ड एवढंच काय ते असतं. तशी आपल्याकडे फारशी गरजही पडत नाही , अशा गोष्टींची..
बांबूच्या काड्या नीट जपून ठेवल्या तर दिवाळीच्या वेळेस आकाशकंदील करण्यास उपयोगी पडू शकतात. तिकडे काड्या मिळत नाही म्हणत होते काह लोकं..
आणि हो, मघा हा लेख अगदी पैलतीर सार्खाच झालाय, आणि म्हणून सकाळकडे पाठवायला हरकत नाही हे सांगायचं राहूनच गेलं. तुम्ही पण बहूतेक सकाळ मनोरंजनात्मक कॉमेंट्स च्या फॅन दिसता :)
वरची कॉमेंट मुद्दाम पैलतीर स्टाइल मधे टाकली आहे, कृपया गैरसमज नसावा..
महेंद्र कुलकर्णी
Post a Comment